उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन, तोडले नियमांचे बंधन
By admin | Published: February 20, 2017 01:58 AM2017-02-20T01:58:02+5:302017-02-20T01:58:02+5:30
महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी रविवार हा शक्ती प्रदर्शनाचा वार ठरला.
प्रचारतोफा थंडावल्या भव्य रॅलीत विना परवानगी गाड्या दुचाकीस्वार विना हेल्मेट
नागपूर : महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी रविवार हा शक्ती प्रदर्शनाचा वार ठरला. सकाळपासूनच उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेत घालून दिलेल्या बंधनांची ऐसीतैसी करीत भव्य कार, बाईक रॅली काढल्या. घेतलेल्या परवानगीच्या तीन ते पाच पट गाड्यांचा वापर करण्यात आला. एवढेच नव्हे तर रॅलीमध्ये शेकडो दुचाकीस्वार विना हेल्मेट स्वार झाले होते. चौकांमधून वाहतूक पोलिसांच्या समोरून या रॅली जात असताना वाहतूक पोलिसांनी मात्र कुणावरही हेल्मेट नसल्याची कारवाई केली नाही. एकूणच उमेदवारांच्या दांडगाईपुढे नियंत्रण ठेवणारी यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रॅली काढण्यासाठी एका उमेदवाराला चारचाकी तीन गाड्या वापरता येणार होत्या. चार उमेदवारांना मिळून अशा १२ गाड्यांची परवानगी होती. रॅली काढण्यासाठी उमेदवारांनी झोन कार्यालयाकडे तेवढ्याच गाड्यांची यादी परवानगीसाठी सादर करून परवानगी मिळविली. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश रॅलीत शंभरावर गाड्या सहभागी असल्याचे पाहायला मिळाले. या गाड्या समर्थकांच्या असल्या तरी त्यांच्यावर पक्षाचे झेंडे, उमेदवारांचे पोस्टर्स लावलेले होते. मात्र, अवैधपणे प्रचार रॅलीत वापरण्यात आलेल्या या गाड्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही.
राजकीय शक्तीप्रदर्शनानंतर सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. तासाभराच्या विश्रांतीनंतर उमेदवारांनी गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली. बऱ्याच फ्लॅट स्कीम, वस्त्यांमध्ये उमेदवारांनी बैठका घेऊन प्रचार केला. गेले १५ दिवस संपूर्ण प्रभागात फिरल्यामुळे आपल्या राहत्या वस्तीकडे दुर्लक्ष झालेल्या उमेदवारांनी तर रात्री वस्तीत छोटी पदयात्राही केली
मजूर अन् ठिय्या कामगारांचा वापर
शहरातील काही भागात उमेदवारांनी काढलेल्या रॅली व पदयात्रांमध्ये बांधकाम मजुरांसह ठिय्या कामगारांची गर्दी पहायला मिळाली. या मजुरांना रोजी देऊन आणण्यात आल्याची चर्चा होती. सुजाण मतदार अशा रॅलीकडे पाहून आश्चर्य व्यक्त करीत होते.
शिवजयंतीचा आधार
शिवजयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी प्रचार संपल्यानंतर उमेदवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. संधीचे सोने करीत अप्रत्यक्षपणे प्रचार केला. जमलेल्या गर्दीत मिसळून उमेदवार नागरिकांशी हात मिळवून, नमस्कार घेऊन मदत करण्याची विनंती करीत होते.
रॅली आल्या आमनेसामने
प्रभागातील जवळपास सर्वच उमेदवारांनी प्रमुख मार्गांनी रॅली काढल्या. जवळपास वेळही सारखीच होती. त्यामुळे बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या रॅली आमनेसामने आल्या. अशावेळी दोन्हीबाजूने जोरदार नारेबाजी व्हायची. काही ठिकाणी तणावही निर्माण झाला होता. शेवटी काही कार्यकर्त्यांनी सामंजस्याने घेत एकमेकांच्या रॅलीला मार्ग मोकळा करून दिला.