डेंग्यूचा डंख
By admin | Published: September 6, 2015 02:40 AM2015-09-06T02:40:05+5:302015-09-06T02:40:05+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूचे रुग्ण कमी दिसून येत आहे. परंतु पोषक वातावरणामुळे व नागरिकांच्या उदासीनतेमुळे...
३६४९ घरांत आढळल्या डासांच्या अळ्या : हनुमाननगर झोनमध्ये सर्वात जास्त डेंग्यूचे डास
नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूचे रुग्ण कमी दिसून येत आहे. परंतु पोषक वातावरणामुळे व नागरिकांच्या उदासीनतेमुळे आॅगस्ट महिन्यात महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला ३६४९ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सर्वाधिक अळ्या महापालिकेच्या हनुमाननगर झोनमधील ९१५ घरांमध्ये दिसून आल्यात. डेंग्यूचा ‘एडिस इजिप्त‘ नावाचा एक डास सुमारे १५०० डासांना जन्माला घालतो. यामुळे नागपूरकरांनो सावधान व्हा, स्वत:हून उपाययोजना न केल्यास नागपुरात डेंग्यू पुन्हा आपले पाय पसरवू शकतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
४ ते १५ वयोगटातील मुलांना सर्वाधिक डंख
२०१४ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण हे ४ ते १५ वयोगटातील होते. ३९४ रुग्ण आढळून आले होते. शून्य ते चार या वयोगटातील ५५ मुले तर ३४ मुली, चार ते आठ या वयोगटात १३१ मुले ९३ मुली, आठ ते पंधरा या वयोगटात ११५ मुले तर ५५ मुली, १५ वर्षांवरील वयोगटात ६४ पुरुष तर ५४ महिला होत्या.
डेंग्यूच्या रोगाने गेल्या वर्षी नागपूरकर बेजार झाले होते. तब्बल ६०१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले होते. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३८५ रुग्णांची नोंद झाली होती तर या वर्षी जानेवारीमध्ये दोन, एप्रिलमध्ये एक, मेमध्ये दोन, जूनमध्ये एक, जुलैमध्ये नऊ तर आॅगस्ट महिन्यात १२ रुग्ण असे एकूण आतापर्यंत २७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या फार कमी आहे. परंतु गेल्या वर्षीच्या सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक नोंद असल्याने नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. अन्यथा या रोगाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
आॅगस्ट महिन्यात २३८१७९ घरांची तपासणी
हिवताप व हत्तीरोग विभागाने आॅगस्ट महिन्यात २ लाख ३८ हजार १७९ घरांची तपासणी केली. यात ३ हजार ६४९ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. सर्वाधिक अळ्या मनपाच्या हनुमाननगर झोनमध्ये ९१५ घरांमध्ये दिसून आल्या. त्या खालोखाल लक्ष्मीनगर झोनमध्ये ७२८,नेहरूनगर झोनमध्ये ५१३, धरमपेठ झोनमध्ये ४०९, आसीनगर झोनमध्ये २२३, लकडगंज झोनमध्ये २८१, मंगळवारी झोनमध्ये १९०, धंतोली झोनमध्ये १६८, गांधीनगर झोनमध्ये १६३ तर सतरंजीपुरा झोनमध्ये ५९ घरांमध्ये अळ्या होत्या.
घरी डासाची उत्पत्ती होऊच देऊ नका
डेंग्यूचा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्यामुळे त्याची पैदास झपाट्याने होते. तपासणीत घरांमधील पाण्याच्या टाक्यात, कुलरमध्ये, घरांच्या टीनावर टाकलेले टायर आणि उघड्या पाण्याच्या ड्रममध्ये, फुलदाणी व अडगळीच्या ठिकाणी पडलेल्या बुटांमध्येही डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. आठवड्यातून एकदा घराची सफाई केल्यास आणि पाणी साठविण्याच्या साहित्याचे डिटर्जंट व ब्लिचिंग पावडरने धुवून काही तासांसाठी वाळू घालून ठेवल्यास या डासाची उत्पत्ती थांबविण्यास मदत होईल.
-डॉ. जयश्री थोटे, हिवताप व मलेरिया अधिकारी, मनपा