गेल्या वर्षीच्या तुलनेत पूर्व विदर्भात डेंग्यूची दुपटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:16+5:302021-07-23T04:07:16+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच डेंग्यूचा धोका वाढल्याने चिंता वाढली आहे. ...
सुमेध वाघमारे
नागपूर : पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच डेंग्यूचा धोका वाढल्याने चिंता वाढली आहे. मागील वर्षी सहा जिल्हे मिळून ५२० रुग्णांची नोंद झाली असताना, केवळ सहा महिन्यातच डेंग्यूचे ३७७ म्हणजे दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत पूर्व विदर्भ डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत असल्याचे बोलले जात आहे.
डेंग्यूचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, जुन्या चुकांमधून धडा घ्यायला कुणीच तयार नाही. डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना, केवळ आरोग्य विभागावर जबाबदारी ढकलली जात आहे. मागील सहा महिन्यात नागपूर, वर्धा व चंद्रपूूर जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
- २०१८ मध्ये ११९० रुग्ण व ११ मृत्यूची नोंद
पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून २०१६ मध्ये २५२ रुग्ण व एक मृत्यूची नोंद झाली. २०१७ मध्ये रुग्णांची संख्या कमी होऊन ३२१ वर आली, परंतु, सहा मृत्यू झाले. २०१८ मध्ये सर्वाधिक, ११९० रुग्ण व ११ मृत्यू झाले. २०१९ मध्ये रुग्ण कमी झाले. ३८८ रुग्ण व एक मृत्यू, तर मागील वर्षी ५२० रुग्ण व दोन मृत्यूची नोंद झाली. यावर्षी सहा महिन्यातच ३७७ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्येत मोठी भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- डेंग्यूचे नागपूर जिल्ह्यात २९१ रुग्ण
नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या तुलनेत जानेवारी ते १४ जुलै यादरम्यान सर्वाधिक २९१ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. यात महानगरपालिकेच्या हद्दीत १८० तर ग्रामीण भागात १११ रुग्ण आढळून आले. याशिवाय, वर्धा जिल्ह्यात ५३, भंडारा जिल्ह्यात ३, गोंदिया जिल्ह्यात ७, चंद्रपूर जिल्ह्यात १२ तर, गडचिरोली जिल्ह्यात १ रुग्ण असे एकूण ३७७ रुग्ण आढळून आले. तूर्तास एकाही मृत्यूची नोंद नाही.
- सहा जिल्ह्यातील डेंग्यूची आकडेवारी
वर्षे :डेंग्यू रुग्ण: मृत्यू
२०१६ :२५२: १
२०१७ :३२१: ६
२०१८ :११९०: ११
२०१९ :३८८: १
२०२० : ५२०: २
२०२१ :३७७ :०
(जूनपर्यंत)
-सहा महिन्यातील स्थिती
नागपूर जिल्हा : २९१
वर्धा जिल्हा : ५३
भंडारा जिल्हा : ०३
गोंदिया जिल्हा : ०७
चंद्रपूर जिल्हा :२२
गडचिरोली जिल्हा :०१