डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 10:48 AM2019-07-24T10:48:02+5:302019-07-24T10:48:51+5:30
डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने खासगी इस्पितळांतील डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्याही मोठी आहे.
उपराजधानीत गेल्या सात वर्षांत मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. शहरात पहिल्यांदाच २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले होते. २०१८ मध्ये ५४३ वर रुग्ण तर जानेवारी ते आतापर्यंत ५० वर रुग्णाची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती सोबतच घराघरांची तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारी कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष रिकामे करून किंवा त्यात कीटकनाशक औषध फवारणी किंवा गप्पी मासे सोडत असल्याने काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. परंतु यात प्रत्येक व्यक्तीने सहभागी होऊन आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस जरी पाळला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यूचा प्रकोप कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. तूर्तास तरी शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असलीतरी डेंग्यू रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णासोबतच ’व्हायरल’रुग्ण वाढल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.