नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पसरतोय डेंग्यू
By सुमेध वाघमार | Updated: June 21, 2024 18:28 IST2024-06-21T18:27:58+5:302024-06-21T18:28:28+5:30
-मागील वर्षीच्या तुलनेत चारपट अधिक रुग्ण

नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पसरतोय डेंग्यू
सुमेध वाघमारे, नागपूर : पावसाला अद्याप सुरूवात झाली नाही. परंतु डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्ण मागील वर्षीच्या तुलनेत चारपट वाढले आहेत. जानेवारी ते मे या कालावधीत २७ रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे वेळीच निदान गरजेचे असते. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२३मध्ये नागपूर शहरात १७ रुग्ण तर या वर्षी आतापर्यंत १२ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये जानेवारी ते मे २०२३ मध्ये ६ रुग्ण असताना या वर्षी २७ रुग्ण आढळून आले. मे महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्याने आणि जुलै ते सप्टेंबर हे पावसाचे महिने राहणार असल्याने स्थिती चिंताजनक होण्याची भिती वर्तवली जात आहे.
-नागपूर विभागात २३७ रुग्णांची नोंद
नागपूर विभागांतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत २३७ रुग्णांची नोंद झाली. मागील वर्षी या कालावधीत केवळ ६० रुग्ण होते. या वर्षी सर्वाधिक रुग्ण चंद्रपूरमध्ये दिसून आले. या जिल्ह्यात ८२ रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, वर्धेत ४६, गोंदियामध्ये ३८, गडचिरोलीमध्ये ३२, नागपूर ग्रामीणमध्ये २७ तर नागपूर शहरमध्ये २७ रुग्ण आढळून आले.
-डेंग्यूपासून असा करा बचाव
- लहान मुलांना पूर्ण हातांचे कपडे घाला
- कुलरच्या टाकीत पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या
- घरात व आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवा व कोठेही पाणी साठू देऊ नका
- रात्री झोपताना मछरदाणीचा वापर करा.
- लहान मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.
- कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा