नागपुरात झोन सभापतीसह भाजप नगरसेवकांच्या घरी सापडल्या डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:43 AM2018-09-09T01:43:39+5:302018-09-09T01:44:29+5:30
डेंग्यूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सत्ताधारी भाजपने मनपा प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांना खूप सुनावले. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले. पदाधिकाऱ्यांकडून सुनावले जात असल्याने संतप्त झालेल्या लकडगंज झोनच्या एका कर्मचाऱ्याने भाजपच्या नेत्यांनाच आरसा दाखवला. या कर्मचाऱ्याने बोलण्याची परवानगी मागत सांगितले की, डेंग्यूच्या जनजागृतीसाठी रॅली काढली जाते. परंतु रॅलीला हिरवी झेंडी दाखवणाऱ्या लोकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या सापडत आहेत. हे ऐकूण सर्वच अवाक झाले. या कर्मचाऱ्याने झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे यांचे नाव घेत इतर तीन-चार भाजपच्या नगरसेवकांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा खुलासा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सत्ताधारी भाजपने मनपा प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांना खूप सुनावले. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले. पदाधिकाऱ्यांकडून सुनावले जात असल्याने संतप्त झालेल्या लकडगंज झोनच्या एका कर्मचाऱ्याने भाजपच्या नेत्यांनाच आरसा दाखवला. या कर्मचाऱ्याने बोलण्याची परवानगी मागत सांगितले की, डेंग्यूच्या जनजागृतीसाठी रॅली काढली जाते. परंतु रॅलीला हिरवी झेंडी दाखवणाऱ्या लोकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या सापडत आहेत. हे ऐकूण सर्वच अवाक झाले. या कर्मचाऱ्याने झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे यांचे नाव घेत इतर तीन-चार भाजपच्या नगरसेवकांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचा खुलासा केला.
या कर्मचाऱ्याने ज्या पद्धतीने निडर होऊन ही गोष्ट सांगितली, त्यामुळे सत्तापक्षाची बोलतीच बंद झाली. अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी बैठक तातडीने आटोपती घेतली. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि दंड ठोठावण्याची गोष्ट करणारे आरोग्य सभापती मनोज चापले यांना स्वत:च्याच झोन सभापती आणि नगरसेवकांरिुद्ध अगोदर गुन्हा दाखल करायला हवा. त्यानंतर नागरिकांवर कारवाईचा विचार करावा लागेल. बैठकीत घडलेला हा प्रकार पदाधिकारी व अधिकाºयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु लोकमतने जेव्हा याबाबत आरोग्य विभागाच्या लकडगंज झोनच्या मलेरिया-फायलेरिया विभागाशी संपर्क साधला तेव्हा मात्र सर्वांनीच आपले हात झटकले. घडलेल्या या प्रकाराची पुष्टी करण्यासाठी मलेरिया-फायलेरिया अधिकारी जयश्री थोटे व लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
वाडीभस्मे यांनी नाकारले आरोप
लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही लोक विचारत आहेत की, माझ्या घरी डेंग्यूच्या अळ्या कुठे सापडल्या. माझ्या घरी कुठल्याही डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या नाहीत. पाणी साचून राहण्यासारखी परिस्थितीही नाही. घराच्या जवळपास डेंग्यूचा प्रादुर्भाव सुद्धा नाही. राहिली गोष्ट गुरुवारी आयोजित बैठकीत माझे नाव येण्याचे तर मी त्या बैठकीतच उपस्थित नव्हतो. तेव्हा कुणी आरोप लावले, याची माहिती घेतो.
तीन तासात जाळताहेत १४० लिटर डिझेल
मनपाच्या मलेरिया-फायलेरिया विभागातर्फे अलीकडेच पाच नवीन फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. औषध व डिझेलचे मिश्रण करून फॉगिंग केली जाते. परंतु विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार ३ तासात १४० लिटर डिझेल जाळले जात आहे. ही माहिती ऐकताच एका ज्येष्ठ नगरसेवकाने मलेरिया-फायलेरिया विभाग डिझेलमध्ये भ्रष्टाचार करीत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. इतके डिझेल जाळले जाऊनही डासांवर मात्र नियंत्रण मिळविता आलेले नाही तसेच आर्द्रता अधिक असताना फॉगिंग केली जात नाही.
६९ रुग्णांनाच डेंग्यू
शहरात हजारोंच्या संख्येत डेंग्यूचे संशयास्पद व पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तरीही मनपाच्या मलेरिया-फायलेरिया विभागाने केलेल्या दाव्यानुसार केवळ ६९ रुग्णांनाच डेंग्यू झाला आहे. दहा झोनमध्ये डेंग्यूचे ९२१ संशयास्पद रुग्ण सापडले. शहरात २६५ रुग्णालये आणि ९५ प्रयोगशाळेतून डेंग्यूशी संबंधित रिपोर्ट मिळाले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्याच्या घरी आणि जवळपास परिसराचे मनपातर्फे निरिक्षण केले जाते. तसेच डेंग्यूच्या अळ्या होऊ नयेत म्हणून स्पेर्इंग आणि फॉगिंग केली जात आहे.