नागपूर जिल्ह्याला डेंग्यू-मलेरियाचा विळखा, रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:50 PM2021-09-26T17:50:47+5:302021-09-26T18:34:49+5:30
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी चिंता व्यक्त करीत गावागावात डेंग्यूचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे.
नागपूर : पावसाळा सुरू होताच जागोजागी पाणी तुंबते व यामुळे डेंग्यू-मलेरियाच्या साथीचा धोका उद्भवतो. जिल्ह्यात कोरोनाची लाट नियंत्रणात आली. तर, दुसरीकडे डेंग्यू मलेरियाने डोके वर काढल्याचे दिसून येते.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी चिंता व्यक्त करीत गावागावात डेंग्यूचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे.
ग्रामीण भागातील डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा विभागाने केला आहे. पण शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये डेंग्यूचे रुग्ण जास्त असल्याने, ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांसह डीएमओ डेंग्यूचे सर्वेक्षण करणार आहेत. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ५२ लाख २३ हजार ८६७ लोकसंख्येमधून शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनूसार निवडलेल्या गावातील ६ ते ७ वर्षाच्या मुलांच्या रक्ताद्वारे तपासण्या करण्यात येणार असून यामध्ये रक्त नमूना घेतल्यानंतर १० मिनीटात ते दुषित आहे किंवा नाही, याचे निदान होणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने नागपूर जिल्ह्यासाठी ८ हजार एफटीएस किट उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.