डेंग्यूमध्ये मृत्यूदर कमी, पण रुग्णात वाढ : रावींद्र भेलोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:14 PM2019-09-24T22:14:50+5:302019-09-24T22:16:07+5:30

पूर्वी डेंग्यूमुळे मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.

Dengue mortality rate low, but patient increases: Ravindra Bhelonde | डेंग्यूमध्ये मृत्यूदर कमी, पण रुग्णात वाढ : रावींद्र भेलोंडे

पत्रपरिषदेत माहिती देताना डॉ. रविंद्र भेलोण्डे, डा. उदय बोधनकर, डॉ. सूचित बागडे व डॉ. मेहश तुराळे.

Next
ठळक मुद्देअकादमी ऑफ पेडियाट्रिक्सची ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा वर्षांपूर्वी जगात सुमारे नऊ देशांमध्ये डेंग्यू आढळून येत होता. आता ११० देशांमध्ये हा रोग पसरला आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण आहे. डेंग्यूचा डास चावल्यानंतर चार-पाच दिवसानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. या कालावधीत रुग्ण एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत असल्याने या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगावर लस नाही. रुग्णाच्या लक्षणावरून उपचार केला जातो. विदर्भातील लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा वाढत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी यात मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.
‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरच्यावतीने आयोजित बालरोगावर १५व्या वार्षिक परिषदेचे आयोजन २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे, याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी परिषदेचे आश्रयदाते डॉ. उदय बोधनकर, ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे सचिव डॉ. महेश तुराळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित बागडे, डॉ. मीना देशमुख, डॉ. अंजली कडू उपस्थित होते. डॉ. भेलोंडे म्हणाले, ही ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद संक्रमक रोगावर आधारीत आहे. डॉ. डी. नारायणप्पा हे परिषदेचे प्रभारी आहेत. परिषदेचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिगंत शास्त्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. डॉ. तुराळे म्हणाले, डॉ. पी. आर. डांगे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. शुभा फडके मार्गदर्शन करतील. परिषदेत, बालकांमधील आजार, उपचार, नवे संशोधन व तंत्रज्ञान यावर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.

अति दूधामुळे बालकांमध्ये वाढतोय अ‍ॅनेमिया
अ‍ॅनेमिया म्हणजे रक्तातील लोहतत्त्वाचे प्रमाण कमी होणे. जगातील ३० टक्के लोकांमध्ये अ‍ॅनेमिया आढळून येतो. आपल्याकडे लहान मुलांमध्ये हा आजार वाढताना दिसून येत आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. अंजली कडू व डॉ. सुचित बागडे यांनी दिली. ते म्हणाले, अनेक माता एक वर्षावरील बालकांना अति दूध पाजतात. यामुळे इतर पौष्टिक आहारासाठी त्याच्या पोटात जागच नसते. परिणामी, अपुऱ्या पोषणमुळे बालकांमध्ये अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढत आहे.

 

Web Title: Dengue mortality rate low, but patient increases: Ravindra Bhelonde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.