नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते जोशी यांच्या मुलीला डेंग्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:46 AM2018-09-20T10:46:09+5:302018-09-20T10:50:44+5:30
शहरात डासांचा प्रकोप वाढला असून, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात डासांचा प्रकोप वाढला असून, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती आहे. नागपुरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाविषयी माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक आयोजित केली आहे.
डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाला अपयश आले आहे. राज्य सरकारला यात हस्तक्षेप करावा लागत आहे. संदीप जोशी यांची मुलगी मानसी बीआरए मुंडले शाळेत इयत्ता आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहे. त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅडमिंटनचा सराव करण्यासाठी जाते. सोमवारी मानसी हिला ताप आला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुासर लक्ष्मीनगर येथील धु्रव पॅथालॉजीत मानसी हिची एनएस १ अेंटीजन टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जोशी शहराबाहेर होते. नागपुरात आल्यानंतर त्यांनी याची सूचना महापालिके च्या मलेरिया-फायलेरिया विभागाला स्वत: दिली. इतर विद्यार्थ्यांना डेंग्यू होऊ नये, याकरिता डासांवर नियंत्रणासाठी त्यांनी मानसी सरावासाठी जात असलेल्या ठिकाणांची व शाळा परिसराची तपासणी करण्याचे निर्देश दिले. मानसी बॅडमिंटन खेळाडू आहे. ती सहा-सात तास दररोज सराव करते. यासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे डेंग्यूचे डास नेमके कोणत्या परिसरात आहेत, हे सांगता येणार नाही. विभागाला याची सूचना दिल्याची माहिती जोशी यांनी दिली.
शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. यावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले आहे. राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठक आयोजित केली आहे.
अधिकारी फ ोन उचलत नाही
मलेरिया-फायलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या खासगी सचिवांनी अनेकदा फोन केले. परंतु थोटे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सचिवाने याची माहिती संदीप जोशी यांना दिली. त्यानंतर जोशी यांनी स्वत: फोन करून त्यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर थोटे यांनी अलइजा टेस्ट करण्याचा सल्ला दिला.
डेंग्यूच्या संशयितांची संख्या वाढली
गेल्या काही महिन्यांत शहरातील डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या १३४८ पर्यंत पोहचली आहे. यातील १०५ पॉझिटीव्ह असल्याला पुष्टी मिळाली आहे. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. डेंग्यूचे डास शुद्ध पाण्यात असतात. मलेरिया-फायलेरिया विभागाला यावर नियंत्रण घालण्यात यश मिळालेले नाही.