सावधान! कामठीत डेंग्यू वाढतोय, येरखेड्यात दुसरा बळी
By जितेंद्र ढवळे | Published: August 28, 2023 03:41 PM2023-08-28T15:41:08+5:302023-08-28T15:42:09+5:30
बाळंतीण महिलेचा मृत्यू
नागपूर : कामठी तालुक्यातील येरखेडा येथे डेंग्यू बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. आठ दिवसानंतर पुन्हा येथे डेंग्यूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. प्रियंका भोवते (२१) रा.वॉर्ड क्र. २, येरखेडा असे मृत महिलेचे नाव आहे. १५ ऑगस्ट रोजी या महिलेची प्रसूती झाली होती. रविवारी सायंकाळी नागपुरातील आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये प्रियंका हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१९ ऑगस्ट रोजी येरखेडा येथील सतीश पाटील (३४) यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. येरखेडा परिसरात वाहणारा नाला आणि तेथील घाणीमुळे या परिसरात डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे. इतकेच काय तर गत पंधरा दिवसांपूर्वी कामठी तालुक्यात डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. आता डेंग्यूमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येरखेडा ग्रा.पं. प्रशासनाने गावात स्वच्छता विषयक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.