जिल्ह्यावर डेंग्यूचे विघ्न, नागपूरात १५ दिवसांत २९५ रुग्णांची नोंद
By सुमेध वाघमार | Published: September 18, 2023 03:38 PM2023-09-18T15:38:21+5:302023-09-18T15:38:48+5:30
सुमेध वाघमारे, नागपूर: एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाला घेऊन उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूने चिंता वाढली आहे. मागील १५ दिवसांत ...
सुमेध वाघमारे, नागपूर: एकीकडे विघ्नहर्त्याच्या आगमनाला घेऊन उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूने चिंता वाढली आहे. मागील १५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात २९५ रुग्णांची नोंद झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात नागपुरकर तापाने फणफणले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे.
‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे वेळीच निदान गरजेचे असते. २०२२मध्ये डेंग्यूचे केवळ ६३ रुग्णांची नोंद असताना या वर्षी १५ सप्टेंबरपर्यंत ७७५ रुग्णांची नोंद झाली आहे. यात नागपूर शहरात ४८४ तर नागपूर ग्रामीणमध्ये २९१ रुग्ण आढळून आले ओहत.
याशिवाय डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या मागील १५ दिवसांत दोन हजारांच्या घरात गेली आहे. पावसाची उघडझाप, तापमान, आर्द्रता आणि अनियोजित शहरी विकासामुळे डासांची घनता वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.