भिवापुरात डेंग्यूचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:36+5:302021-07-15T04:07:36+5:30
भिवापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नागरिक सावरत असतानाच आता डेंग्यूचे वाढते रुग्ण आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शहरासह ...
भिवापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नागरिक सावरत असतानाच आता डेंग्यूचे वाढते रुग्ण आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शहरासह तालुक्यातील गावखेड्यातही सुध्दा या आजाराचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे अंतर्गत स्वच्छतेसह प्रशासनाने फॉगिंग मशीनव्दारे गावागावात धुरळणी करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अस्वच्छतेतून पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचीही भीती वाढली आहे. भिवापूर शहरासह तालुक्यातील मालेवाडा, सोमनाळा व आदी लगतच्या गावात आठवडाभरात दोन चार रुग्ण आढळले आहे. यातील काही शहरातील खाजगी रुग्णालयात तर काही उमरेड आणि नागपूर येथे उपचार घेत असल्याचे समजते. पावसाळा आला असताना अद्यापही अनेक गावात अंतर्गत नाल्यांची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. जिकडे तिकडे घाण पसरलेली आहे. प्रशासनाने गावातील अंतर्गत नाल्यांची स्वच्छता, फॉगिंग मशीनने धुरळणी करणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी अद्यापही या कामांना प्राथमिकता देत हात लावलेला नाही. त्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांनी तोंड वर काढलेले आहे. नगरपंचायत प्रशासनासह तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीनी गावातील अंतर्गत स्वच्छता व फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी करण्यास प्राथमिकता द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.