उमरेड परिसरात डेंग्यूचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:48+5:302021-07-09T04:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : परिसरात सुमारे दोन आठवड्यापासून डेंग्यू तथा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यातील मकरधोकडा, सेव, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : परिसरात सुमारे दोन आठवड्यापासून डेंग्यू तथा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यातील मकरधोकडा, सेव, वडेगाव, पिरावा, कळमना आणि उमरेड शहरातील काही भागातील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. दोन आठवड्यात तालुक्यात १५ ते २० रुग्ण आढळून आल्याची विश्वसनीय माहिती आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
परिसरातील रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता प्रशासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्यास तातडीने औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहनसुद्धा केले जात आहे. एडिस इजिप्टाय या डासामार्फत प्रसार होणारा डेंग्यू गंभीर विषाणूजन्य आजार आहे. टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात, स्टोअर केलेले पाणी, कूलरचे जमा केलेले पाणी आदी ठिकाणे या डासाची उत्पत्ती करणारी आहेत.
अचानक वाढणारा ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी आदी लक्षणे डेंग्यूची असून, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. योग्य उपाययोजना करावी. परिसर स्वच्छ ठेवावा. शिवाय, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन केले जात आहे. पालिकेने फॉगिंग मशीनच्या माध्यमातून फवारणी करावी, स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, सर्वेक्षण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.