उपराजधानीला डेंग्यूचा डंख
By Admin | Published: July 19, 2015 03:13 AM2015-07-19T03:13:58+5:302015-07-19T03:13:58+5:30
मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे.
मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर भर
ंनागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने या रोगाचा शहरात फैलाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात डेंग्यूचे संशयित रु ग्ण आढळून येत असतानाच जुलै महिन्यात शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाने केला आहे. वास्तविक डेंग्यूची चाहूल लागल्याने मनपा प्रशासनाने मे महिन्यात जनजागृती अभियान हाती घेतले होते. या आजाराची लक्षणे व त्यापासून संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची खरदारी या विषयी लोकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने डेंग्यूच्या उत्पत्तीला संजीवनी मिळाली आहे.
गेल्या दोन आठवड्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संंख्येत वाढ झाल्याची माहिती सदर येथील एका पॅथॉलॉजी संचालकाने दिली. शहराच्या उत्तर व दक्षिण भागातील अविकसित ले-आऊ टमध्ये टिकठिकाणी खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत एमएल आॅईलची फवारणी केली जाते. परंतु यामुळे डासांना आळा बसत नाही.
वातावरण दमट असल्याने फॉगिंगचाही उपयोग होत नाही. आॅगस्ट महिन्यात डेंग्यूला सुरुवात झाली होती. यावर्षी मात्र जुलै महिन्यातच या आजाराने डोके वर काढले आहे.
डेंग्यू होण्याची कारणे
उपराजधानीला डेंग्यूचा डंख
नागपूर : एडीज इजिप्ती मादी डास असतो. तो दिवसाला चावतो. हा डास चावल्याने डेंग्यूचे विषाणू माणसाच्या शरीरात शिरतात. या डासाची उत्पत्ती पाण्याची टाकी, जुने टायर, जमा झालेले पाणी आदी ठिकाणी होते. या आजावर उपचार होतो. परंतु वेळीच दखल घेण्याची गरज आहे.
डेग्यूची लक्षणे
ताप येणे, सांधे दुखणे
शरीर अकडणे
सर्दी-खोकला व डोके दुखणे
अंगावर लाल डाग पडणे
पोट अकडणे, भूक न लागणे
मळमळ व ओकारी होणे
रक्तपेशी कमी होणे
कसा कराल बचाव
झोपताना पूर्ण शरीरावर पांघरुण घ्यावे
कुलर काढून पाणी साचू न देणे
विद्यार्थ्यांत डेंग्यूविषयी जागृती करणे
घर व कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवणे
आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवणे
पाण्याची टाकी नियमित साफ करणे
खुल्या जागेत वा छतावर पाणी साचू न देणे
डेंग्यूचे प्रकार
डेंग्यूचे दोन प्रकार आहेत. यात हिमोरहेजिक डेंग्यू व शॉक डेंग्यू याचा समावेश आहे. वेळीच उपचार न झाल्यास हिमोरहेजिक डेंग्यू होण्याची अधिक शक्यता असते.यात दोन-तीन दिवस ताप राहतो. आतड्यात व हृदयात रक्तस्राव होतो. रक्तदाब कमी झाल्याने रुग्णाला धक्का बसून मृत्यू होण्याचा धोका असतो.
अशी होते तपासणी
डेंग्यूची लक्षणे आढळून आल्यास रक्त तपासणी करावी. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते. प्लेटलेट्स कमी झाल्यास आयजी-जी, आयजी-एन, एनएसटी एंटीजन आदी तपासण्या केल्या जातात. तसेच एलआयजी तपासणी केली जाते. मेयो रुग्णालयात उपचाराची सुविधा आहे.