नागपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:12 PM2019-09-26T12:12:55+5:302019-09-26T12:13:20+5:30
नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती आढळली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सात गावांमध्ये डेंग्यूसदृश स्थिती आढळली आहे. गेल्या काही दिवसात व्हायरल इन्फेक्शन सोबतच डेंग्यूच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहे. पावसाळ्यात डेंगीच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पूरक वातावरण निर्माण होते. या डासांनी चावा घेतल्यास डेंग्यूची लागण होते. आरोग्य विभागाने केलेल्या घरांच्या सर्वेमध्ये जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील इसापूर, मौदा तालुक्यातील किरणापूर, नागपूर शहरांतर्गतच्या बक्षी ले-आऊट, नागपूर ग्रामीण तालुक्यातील सुरक्षानगर, हिंगणा तालुक्यातील साईनगर व कामठी तालुक्यातील यादवनगर या ठिकाणी अनेक घरांतील साचवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूसदृश अळ्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाल्या. या गावातील घराचा हाऊस इंडेक्स हा १० पेक्षा अधिक असून, तेथे या डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यासाठी विभागामार्फत नागरिकांना अबेटिंग नावाचे औषध देऊन प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच परिसरातील नागरिकांना साधारण तापही असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याचा सूचनाही विभागाकडून करण्यात आल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.