उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू; रुग्णालयातील गर्भवती अन् बाळंतीण महिलाही विळख्यात
By सुमेध वाघमार | Published: September 3, 2023 07:45 PM2023-09-03T19:45:00+5:302023-09-03T19:46:24+5:30
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आतापर्यंत तीन डॉक्टरांसह दोन बाळंतणीला व एका गर्भवती मातेलाही डेंग्यूचे निदान झाले आहे.
नागपूर : डेंग्यूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांपासून ते भरती रुग्णांनाही डेंग्यू होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात आतापर्यंत तीन डॉक्टरांसह दोन बाळंतणीला व एका गर्भवती मातेलाही डेंग्यूचे निदान झाले आहे.
गांधीबाग सारख्या गजबजलेल्या परिसरात डागा रुग्णालय आहे. या रुग्णालयातील ३६५ खाटा नेहमीच फुल्ल असतात. दिवसाकाठी रोज १५ ते २० येथे प्रसूती होतात. रुग्णालयातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. परंतु रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची संख्या मोठी राहत असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. रुग्णालयाच्या परिसरात अनेक छोट्या नाल्या तुंबलेल्या आहेत. काही ठिकाणी अजूनही कुलर सुरू असून त्याचे पाणी बदलले जात नाही. शिवाय, काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढून उपचार करणारे डॉक्टरच डेंग्यूच्या विळख्यात सापडत आहे. या दोन आठवड्यात तीन डॉक्टरांना डेंग्यू झाला आहे. यातील दोन प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर आहेत. उपचार घेतलेल्या दोन बाळंतणीला व एका गर्भवती मातेलाही डेंग्यू झाला आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मनपाला दिले पत्र
डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांनी याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, डासांचा रोकथामसाठी आम्ही आवश्यक पावले उचलेली आहेत. सोबतच मनपाचा आरोग्य विभागाला किटकनाशक फवारणीसाठी सांगितले आहे.