‘अलिगड’च्या प्रदर्शनावर स्थगितीस नकार
By Admin | Published: February 26, 2016 03:10 AM2016-02-26T03:10:21+5:302016-02-26T03:10:21+5:30
समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यास
हायकोर्ट : समलैंगिक प्राध्यापकाच्या जीवनावरील चित्रपट
नागपूर : समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या एका दिवंगत प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित ‘अलिगड’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या चित्रपटाविरुद्ध संबंधित प्राध्यापकाच्या लहान भावाने रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यास नकार देऊन प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला. प्रतिवादींमध्ये केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव, सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनचे संचालक, चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता आदींचा समावेश आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास संबंधित प्राध्यापकाची सर्वत्र बदनामी होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीने संबंधित प्राध्यापकाची भूमिका केली आहे. संबंधित प्राध्यापक अलिगड मुस्लिम विद्यापीठात होते. ९ फेब्रुवारी २०१० रोजी त्यांच्या समलैंगिकतेची सवय पुढे आली. यानंतर ९ एप्रिल २०१० रोजी ते स्वत:च्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. ‘अलिगड’ चित्रपट कोठेही व कोणत्याही पद्धतीने दाखविण्यावर बंदी आणावी, सेंसर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र परत घेण्यात यावे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे चित्रपट निर्मात्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती होती. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. एम. अनिलकुमार यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)