दंत महाविद्यालयाला अतिविशेषोपचाराचा दर्जा हवा
By admin | Published: December 21, 2015 03:04 AM2015-12-21T03:04:28+5:302015-12-21T03:04:28+5:30
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात मुख रोगनिदान व क्ष-किरणशास्त्र, दंतविकृतीशास्त्र, मुखशल्यशास्त्र हे तिन्ही विभाग अद्ययावत आहेत.
प्रस्तावाकडे अद्यापही दुर्लक्षच : मात्र, मुंबईच्या दंत रुग्णालयाला मंजुरी
सुमेध वाघमारे नागपूर
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात मुख रोगनिदान व क्ष-किरणशास्त्र, दंतविकृतीशास्त्र, मुखशल्यशास्त्र हे तिन्ही विभाग अद्ययावत आहेत. या विभागातून रुग्णाला उच्च दर्जाची सेवा दिली जात आहे. मुखपूर्व कर्करोगाचे निदानही केले जात आहे, असे असतानाही या रुग्णालयाला अतिविशेषोपचाराच्या दर्जापासून दूर ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या दर्जासाठी केंद्राने मुंबईच्या दंत रुग्णालयाला मंजुरी दिली आहे, मात्र नागपूरला उपेक्षित ठेवल्याचे बोलले जात आहे.
दंत रुग्णालयात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आदी राज्यातून रुग्ण येतात. वर्षभरात ५० हजार रुग्णांवर उपचार केले जातात, तर किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या २० हजारावर शस्त्रक्रिया होतात. रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणे आणि साधनसामुग्रीद्वारे उपचार केले जातात. डेन्टल इम्प्लांट, लेझर थेरपी, सीटी स्कॅन, कॅन्शिअस सिडेशन, ओरल कॅन्सरवर आधुनिक पद्धतीच्या निदान व उपचार पद्धती या रुग्णालयात उपलब्ध आहेत. याशिवाय मुखशल्यशास्त्र विभागाने ट्रामा केअर सेंटरही निर्माण केले आहे. या विभागाची चमू मॅक्सीलोफेसिअल ट्रामा हाताळण्यास सज्ज आहे. कृत्रिम दंतशास्त्र विभाग ‘कॅडकॅम’ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबनावर भर देत रुग्णसेवा देत आहे. दंतव्यंगोपचारशास्त्र विभागाने चौकटीबाहेर जाऊन ‘इनव्हीजीलाईन ट्रीटमेंट’ आणि ‘आॅब्स्ट्रक्टीव्ह स्लिप अपनिया’ या क्षेत्रात संशोधनावर लक्ष केंद्रित केले आहे. मुखरोग निदानशास्त्र विभागात मध्य भारतातील सर्वात प्रगत सीटी स्कॅन मशीन उपलब्ध आहे. यामुळे सर्वसामान्यापर्यंत प्रभावी उपचार पद्धत पोहोचविली जात आहे. सामाजिक दंतशास्त्र विभाग महाविद्यालयात कार्यरत आहे. असे असतानाही हे रुग्णालय अतिविशेषोपचाराच्या दर्जापासून दूर आहे.
प्रस्तावाची दखल केव्हा?
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला अतिविशेषोपचाराचा दर्जा मिळावा यासाठी वर्षभरापूर्वी पालकमंत्र्यांपासून इतर सर्व वरिष्ठ मंत्र्यांना प्रस्ताव पाठविला. या महाविद्यालयाचा विस्तार व विकास ‘एम्स डेंटल’, नवी दिल्लीच्या धर्तीवर व्हावा असा प्रस्ताव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात येते, परंतु अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही.
८ हजार चौ. फूट जागेची गरज
अतिविशेषोपचार केंद्रासाठी रुग्णालयाला ८००० चौ.फूट जागेची आवश्यकता आहे. श्रेणीवर्धनासाठी १० कोटीच्या निधीची गरज आहे. त्याच धर्तीवर जागेचा व निधीचा प्रश्न सुटल्यास रुग्णाना अद्ययावत सोयी उपलब्ध होऊ शकतील.
अतिदुर्गम भागातही रुग्णसेवा
महाविद्यालयातर्फे सामजिक दंतशास्त्राच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम म्हणून अतिदुर्गम भागात दंत शिबिरांमधून रुग्णसेवा दिली जात आहे. या शिवाय गुटखा व तंबाखु सेवनामुळे होणाऱ्या रोगांबाबत संशोधन तसेच वैद्यकीय पुरावे वेळोवेळी शासनाला उपलब्धही करून दिले जात आहे.