नागपुरात डेंटलच्या विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:11 PM2020-02-14T23:11:34+5:302020-02-14T23:13:04+5:30
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) अधिष्ठाता विद्यार्थ्यांना वारंवार मागत असलेल्या पत्राला घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गोंधळ घातला. या प्रकारामुळे खळबळ उडून काही प्रमाणात रुग्णसेवा प्रभावित झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) अधिष्ठाता विद्यार्थ्यांना वारंवार मागत असलेल्या पत्राला घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी गोंधळ घातला. या प्रकारामुळे खळबळ उडून काही प्रमाणात रुग्णसेवा प्रभावित झाली होती. उद्या शनिवारी यावर अधिष्ठात्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे.
डेंटलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र अशी सोय नाही. यामुळे अनेक विद्यार्थी लायब्ररीमध्येच अभ्यास करतात. पूर्वी ही लायब्ररी रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरू रहायची. परंतु आता मनुष्यबळ नसल्याने सायंकाळी ५ वाजताच लायब्ररी बंद होते. गेल्या काही दिवसांपासून लायब्ररीचे नुतनीकरणाचे कामही सुरू होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ आणि नुतनीकरणाचे काम एकाच वेळी सुरू असायचे. आज ना, उद्या काम संपेल या अपेक्षेवर विद्यार्थी निमूटपणे अभ्यास करायचे. परंतु अचानक चार-पाच दिवसांपूर्वी नुतनीकरणाचे काम थांबविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांना विचारणा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भातील पत्र देण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी पत्र दिले. परंतु चार दिवस होऊनही पत्राचे उत्तर मिळाले नाही. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी नुतनीकरणाचे काम कधी सुरू होईल व कधी संपेल याबाबत पुन्हा विचारणा केली असता अधिष्ठाता डॉ. फडनाईक यांनी पुन्हा पत्राची मागणी केली. यावर विद्यार्थी संतापले. इंटर्नपासून सर्व विद्यार्थी एकत्र आले. दुपारी ४ वाजेपर्यंत चांगलाच गोंधळ घातला. अखेर डॉ. फडनाईक यांनी त्यांची समजूत घालून शनिवारी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे सध्यातरी हे प्रकरण निवळले असलेतरी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष कायम असल्याचे चित्र आहे.