कपाशीच्या नुकसानीबाबत कृषी विभाग अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:55 AM2020-09-26T00:55:23+5:302020-09-26T00:56:42+5:30
यंदा सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे सर्वेक्षण केले. पण कापसाचीसुद्धा अशीच स्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी समितीच्या झालेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे समिती सभापतींनी बैठकीतच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे सर्वेक्षण केले. पण कापसाचीसुद्धा अशीच स्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी समितीच्या झालेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे समिती सभापतींनी बैठकीतच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. त्यानंतर कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांच्याकडून माहिती घेतली असता, ते म्हणाले की, गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत १४ हजार १२४ हेक्टर जिराईत, १५८३ हेक्टर बागाईत व ७६.९९ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. त्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या चमूने भेट देऊन पाहणी केली शिवाय शासनाकडून जाहीर झालेली मदत तोकडी असून त्यात अधिक भर घालण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या पुरात ३३ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले तर ४५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पावसाने पिवळे पडले. त्यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. कौशल्य विकास अंतर्गत आत्माच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच रब्बी मक्का पिकासाठी अडीच हजार हेक्टर क्षेत्रात लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
१६,७५४ जनावरे लम्पीने बाधित
यंदा राज्यात जनावरांवर लम्पी या संसर्गजन्य आजाराने हल्ला केला असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने परिस्थिती चांगली हाताळल्याची पावती त्यांनी दिली. जिल्ह्यात ५ लाख ५९ जनावरे आहेत. त्यात १,१२,७०० लस प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १ लाखांवर जनावरांचे लसीकरण झाले असून १४ हजार ७९९ जनावरांना लवकरच लस दिली जाईल. आतापर्यंत १६ हजार ७५४ जनावरे या आजाराने बाधित आढळल्याचे त्यांनी सांगितले.