पशुसंवर्धन विभागाने तारली ग्रामीण अर्थव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:43+5:302021-05-23T04:06:43+5:30
नागपूर : कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. पण पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. ...
नागपूर : कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला. पण पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय लॉकडाऊनमध्येही सुरळीत सुरू होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धनविषयक व्यवसायाकडे वळलेले दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे फक्त याच व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्था तारलेली दिसत आहे.
जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी ग्रामीण अर्थकारण आणि पशुसंवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. कृत्रिम रेतन, कृती शिबिर, लसीकरण मोहीम, चर्चासत्र, वंध्यत्व निवारण शिबिर आदी माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. परंतु कोविडमुळे जनसमूह एकत्र करणे योग्य नसल्याने पशुवैद्यकांनी आपापल्या क्षेत्रात नियमित कर्तव्य बजावले. गेल्यावर्षी कोरोना संसर्गासोबतच पशुंवरदेखील लम्पी आजार झाला होता. वेळीच जिल्ह्यातील संपूर्ण पशुवैद्यकीय चमूंनी नियोजन करून अवघ्या काही दिवसातच नियंत्रण मिळविले. त्याचदरम्यान नागपूर व कामठी तालुक्यात बर्ड फ्लूने पक्षी मृत झाल्याचे आढळले. विभागाने यावरही प्रतिबंध घातला.
- नाविन्यपूर्ण योजना व डीपीडीसीतूनही लाभ
नाविन्यपूर्ण योजना व डीपीडीसीतून ७०२ गाय गट तसेच ९९० शेळी गट व १ हजार पक्ष्याचे १८ कुक्कुट पक्षिगृह बांधकाम वाटप करून या व्यवसायाला अधिक चालना देण्यात आली आहे. या आर्थिक वर्षात पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने ३१६ गाय गट, ५५६ शेळी गट वाटप करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे वैद्य म्हणाले.
- दूध उत्पादन वाढविण्यावर भर
प्रत्येक शेतकऱ्याला योजनेमार्फत दुधाळ जनावरे देणे शक्य नसल्याने त्यांच्या घरच्या गाईपासून चांगल्या प्रतीच्या जास्त दूध देणाऱ्या कालवड तयार करण्याचे कार्य राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५२६ गावांमध्ये सुरू आहे. विदर्भ,मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना बहुवार्षिक चारा हायब्रीड नेपियरचा पुरवठा करून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देण्यात येत आहे.