पुरातत्त्वशास्त्र विभागातून कोट्यवधींची नाणी गायब ?

By Admin | Published: March 30, 2016 03:00 AM2016-03-30T03:00:33+5:302016-03-30T03:00:33+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Department of Archeology missing crores of coins? | पुरातत्त्वशास्त्र विभागातून कोट्यवधींची नाणी गायब ?

पुरातत्त्वशास्त्र विभागातून कोट्यवधींची नाणी गायब ?

googlenewsNext

नागपूर विद्यापीठ : अधिकाऱ्यांचे कानावर हात, चौकशी समितीच्या अहवालावर मौन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या नाण्यांचा हिशेब लागत नसून याबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवालदेखील गोपनीय ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पुरातन नाण्यांना मोठी किंमत असते. त्यानुसार संबंधित नाण्यांचे मूल्य कोट्यवधी रुपये असण्याची शक्यता आहे.

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागात विविध ठिकाणी उत्खनानात सापडलेले प्राचीन अवशेष, मूर्ती तसेच नाणी ठेवण्यात येतात. विद्यार्थी यावर संशोधनदेखील करतात. याला नोंदणीकृत ‘अँन्टीक्वीटी’ असे म्हणतात. याची विभागात दरवर्षी नोंद होते. याची यादीदेखील तयार करण्यात येते व विद्यापीठाकडून याची मोजणीदेखील होते.
पवनार जवळील एका शेतात काही वर्षांपूर्वी देशमुख नावाच्या एका व्यक्तीला नाणी सापडली होती. याजवळच विभागातर्फे उत्खननाचे काम सुरू असल्यामुळे त्याने २०० हून अधिक नाणी विभागाकडे सुपूर्द केली होती. ही नाणी वाकाटककालीन होती व यात चांदी, सोन्याच्या नाण्यांचादेखील समावेश होता. आंतरराष्ट्रीय बाजारात तस्कर अशा नाण्यांच्या शोधातच असतात व या नाण्यांची किंमत कोट्यवधी रुपयेदेखील येऊ शकते. या नाण्यांची छायाचित्रदेखील काढून ठेवण्यात आली होती. परंतु काही कालावधीनंतर संबंधित नाणी विभागात नसल्याची बाब समोर आली. यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांना धक्का बसला होता व पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सखोल चौकशी केली होती व अहवाल सोपविला होता. परंतु त्यानंतर अहवालावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शिवाय नाणी गायब झाल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रारदेखील झालेली नाही, अशी माहिती विद्यापीठातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.(प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांचे मौन
यासंदर्भात विभागप्रमुख डॉ. प्रीती त्रिवेदी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यासच नकार दिला. संबंधित प्रकरणाची माहिती तुम्हाला कुठून मिळाली, असा प्रश्न करत प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आल्याचे उत्तर दिले. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनीदेखील या प्रकरणावर ठोस उत्तर दिले नाही. या नाण्यांचा दरवर्षी नियमितपणे हिशेब ठेवण्यात येतो. त्यामुळे नाणी गायब झाली असतील असे वाटत नाही. तरीदेखील तपासणी झाल्यावरच याबाबत नेमके काय ते सांगता येईल, असे मोघम उत्तर त्यांनी दिले.

Web Title: Department of Archeology missing crores of coins?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.