एकटेपणाच्या ‘केमेस्ट्री’तून विभागप्रमुखांचे आत्महत्येचे पाऊल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:35+5:302021-08-24T04:11:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ वर्तुळात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. डॉ. मेश्राम या उच्चविद्याविभूषित होत्या. शिवाय त्यांची कामाची शैलीदेखील अतिशय मनमिळावू होती. विभागाला आणखी अपडेट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते व दोन दिवसाअगोदर आपण आता आणखी उत्साहाने काम करू, असे त्यांनी सर्व सहकाऱ्यांना म्हटले होते. अशास्थितीत अचानक आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे पती निधनानंतर आलेला एकटेपणा कारणीभूत आहे की दुसरे कारण आहे, हाच प्रश्न सर्वांना भेडसावतो आहे.
५६ वर्षीय डॉ. मेश्राम या रसायनशास्त्रातील तज्ज्ञ प्राध्यापिका होत्या. देश-विदेशात त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली होती व पुरस्कारदेखील मिळाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध समित्यांवरदेखील त्यांनी काम केले होते. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख म्हणूनदेखील त्यांनी कार्य केले होते. सर्वच आघाड्यांवर कामात अतिशय निपुण असलेल्या डॉ. मेश्राम यांच्या आत्महत्येने विद्यापीठ परिसरातील सर्वच विभागातील प्राध्यापकांना धक्का बसला आहे.
नॅकचा तणाव नव्हता
डॉ. मेश्राम यांना नॅकच्या दौऱ्याचा तणाव होता, अशी चर्चा रंगली होती. परंतु विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी याचे खंडन केले आहे. १७ ऑगस्ट रोजी त्या सुटीहून परतल्या. यादरम्यान नॅकची रंगीत तालीम उत्तमरीत्या पार पडली होती. डॉ. मेश्राम यांनी पूर्वतयारी केली असल्याने समितीदेखील समाधानी होती. शिवाय विभागाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. त्यामुळे त्याचा तणाव येण्याची शक्यताच नव्हती, असे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी सांगितले.
पतीच्या निधनानंतर तणावात, पण मानसिकदृष्ट्या खंबीर
यासंदर्भात लोकमतने विभागातील त्यांचे सहकारी, विद्यार्थी यांना विचारणा केली पती डॉ. सुधीर मेश्राम यांच्या निधनामुळे त्या काहीशा एकट्या नक्कीच पडल्या होत्या व एकटेपणाच्या विचाराने त्या काहीशा तणावात असायच्या. परंतु मानसिकदृष्ट्या बाहेरून तरी त्या खंबीर वाटत होत्या, अशी माहिती मिळाली. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या मुलाकडून आल्यानंतर त्या आणखी जोमाने कामाला लागल्या होत्या. शनिवारपर्यंत त्यांनी उत्साहाने सर्वांसोबत काम केले. व्यावसायिक आयुष्यात त्यांना कसलाही तणाव नव्हता. खासगी आयुष्याबाबत त्या फारशा बोलत नसत, असे त्यांच्या परिचितांनी सांगितले.