धनादेश ‘रॅकेट’ची होणार विभागीय चौकशी
By admin | Published: February 26, 2016 02:57 AM2016-02-26T02:57:22+5:302016-02-26T02:57:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील धनादेश ‘रॅकेट’ उघडकीस आल्यानंतर वित्त विभागासह संपूर्ण प्रशासन हादरले आहे.
नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेची बैठक तापली
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील धनादेश ‘रॅकेट’ उघडकीस आल्यानंतर वित्त विभागासह संपूर्ण प्रशासन हादरले आहे. सुरुवातीला केवळ बँकेकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या प्रशासनाला आता मात्र विद्यापीठातदेखील याची ‘लिंक’ आहे की काय असा प्रश्न पडायला लागला आहे. यासंदर्भात अंतर्गत विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधात गुरुवारी बोलविण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत न्यायालयीन चौकशीच्या मागणीवरून काही सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनोखळी व्यक्तीने नागपूर विद्यापीठाच्या ‘बँक आॅफ इंडिया’च्या खात्यातून बनावट धनादेशाच्या माध्यमातून ३१ लाख रुपयांची रक्कम काढली. हा प्रकार उघडकीस येऊन अवघे २४ तासदेखील झाले नसताना वित्त विभागाला आणखी एक झटका बसला. रूपेश रणदिवे या कंत्राटदाराच्या नावाने तयार झालेले दोन लाख तीन हजारांचे दोन धनादेश परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीने विभागातून नेले आणि ते वटविले.
अगोदरच ३१ लाख रुपयांच्या प्रकरणात विद्यापीठाचे तोंड पोळले असताना ही बाब समोर आल्यामुळे अधिकारी अक्षरश: हादरले. गुरुवारी विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली व विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चौकशी बाहेरील व्यक्तींकडून करविण्यात येईल व यात वित्त तज्ज्ञ, बँकेतील जेष्ठ अधिकारी, चार्टर्ड अकाऊन्टंट, वित्त विश्लेषक आणि अधिकारी पातळीवरील व्यक्तींचा समावेश राहणार आहे. नेमकी कुठे चूक झाली, प्रक्रियेत काय त्रुटी होत्या व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर या चौकशीचा भर असेल. या समितीमधील व्यक्तींच्या निवडीचे अधिकार मला देण्यात आले आहेत, अशी माहिती कुलगुरूंनी दिली.