नागपुरात येस बँकेत विड्रॉलसाठी खातेदारांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:02 PM2020-03-06T22:02:25+5:302020-03-06T22:05:25+5:30

नागपुरात ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच येस बँकेचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय आणि खामला, रामदासपेठ व सीए रोडवरील शाखेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली.

Depositors rushed for withdrawal in Yes Bank in Nagpur | नागपुरात येस बँकेत विड्रॉलसाठी खातेदारांचा गोंधळ

नागपुरात येस बँकेत विड्रॉलसाठी खातेदारांचा गोंधळ

Next
ठळक मुद्देबँकेवर प्रशासकाची नियुक्ती५० हजारांपर्यंत विड्रॉलची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करून पुढील आदेशापर्यंत खातेदारांना ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास बंदी घातली आहे. हे वृत्त धडकताच खातेदार आणि ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच बँकेचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय आणि खामला, रामदासपेठ व सीए रोडवरील शाखेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. पैसे काढण्यावरून बँकेच्या मुख्यालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. जवळपास ५०० पेक्षा जास्त खातेदारांनी विड्रॉल घेतल्याची माहिती आहे.
मुख्यालय आणि शाखांमध्ये गर्दी वाढल्याने कॅशियरने दुपारी १.३० वाजता खातेदारांना विड्रॉलसाठी टोकन देणे बंद केल्याने खातेदार चिडले. शिवाय टोकन असलेल्यांना पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने त्यांनी आपला राग व्यवस्थापकावर काढला.
नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचारी म्हणाला, उपलब्ध रकमेचे खातेदारांना वाटप केले आहे. प्रत्येकजण ५० हजार रुपये विड्रॉल करीत आहे. रिझर्व्ह बँकेतून रक्कम येईपर्यंत वाट पाहावी लागेल. खातेदारांच्या रोषाचा आम्हाला सामना करावा लागत आहे. ही आमच्यासाठी संकटाची स्थिती आहे. सदर प्रतिनिधीने बँकेच्या मुख्यालयाला भेट देऊन खातेदारांशी चर्चा केली.

व्याज मिळणार नसल्याने संकट
बँकेचे सदर निवासी ८३ वर्षीय खातेदार रमेश शर्मा म्हणाले, वर्षापूर्वी बँकेत २० लाख रुपये होते. पण बँकेसंदर्भात उलटसुलट बातम्यानंतर १३ लाख विड्रॉल केले. आता ७ लाख रुपये जमा आहेत. आता व्याज मिळणार नसल्याने संकट आले आहे. भारत ट्रेडचे कर्मचारी सुनील घुटके म्हणाले, विड्रॉलसाठी सकाळी ९ पासून बँकेत आलो आहे. दीड वाजले तरीही पैसे मिळालेले नाहीत. अमित गुप्ता म्हणाले, गावात १५ मार्चला पुतणीचे लग्न आहे. भावाकडून उधार घेतलेले दीड लाख त्याला परत करायचे आहे. बातमीनंतर सकाळी जेवण न करताच बँकेत आलो. दीड वाजता ५० हजार रुपये मिळाले. उर्वरित रक्कम व्याजाने घेऊन भावाला परत करावी लागेल.

खातेदार संजय गावंडे म्हणाले, मुलीच्या दहावीच्या शिक्षणासाठी ७५ हजार रुपये आणि माझे १ लाख रुपये आहेत. दोन विड्रॉलद्वारे एक लाख रुपये मिळाले आहेत. सेवा चांगली असल्याने बँकेत अकाऊंट काढले. आपलेच पैसे विड्रॉल करण्यासाठी तीन तास रांगेत उभा होतो. डी.एस. एन्टरप्राईजेसचे दिनेश सेवक यांनीही बँकेच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. विड्रॉल तातडीने देण्याची मागणी केली. खातेदार कमलाकर करांगळे म्हणाले, तीन तासांपासून टोकन घेऊन बसलो आहे. ५० हजार रुपये देण्यास उशीर करीत आहेत. बँकेत पैसे जमा आहेत. पुढील विड्रॉल कसे होणार, यावर चिंतित आहे.

कर्मचाऱ्यांना जानेवारीचा पगार नाही
बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ८ तारखेला होतो. पण जानेवारीचा पगार अजूनही मिळालेला नाही. बँक डबघाईस आल्याने जानेवारीसह फेब्रुवारीचा पगार मिळणार वा नाही, याबद्दल शंका आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारावर मर्यादा आल्याने कर्मचाऱ्यांची कपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा नवीन रोजगार शोधावा लागेल, असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर बँकेच्या कर्मचाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.

खातेदारांची सकाळपासूनच गर्दी आहे. त्यांना ५० हजारांचे विड्रॉल देत आहोत. बँकेच्या आर्थिक स्थितीवर बोलण्याचा अधिकार नाही. वरिष्ठांशी संपर्क साधा.
सचिन निमा, व्यवस्थापक, मुख्यालय.

Web Title: Depositors rushed for withdrawal in Yes Bank in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक