नागपुरातील ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; फक्त १२ उमेदवारांना डिपॉझिट वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:13 PM2024-11-25T16:13:51+5:302024-11-25T16:16:04+5:30
Nagpur Assembly Vidhan Sabha Election 2024 Result : अपक्षदेखील ठरले प्रभावहीन ; सर्वांत कमी मतांचा आकडा '३१'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांत यंदा तब्बल ११७ उमेदवार रिंगणात होते. मात्र सहाही मतदारसंघांतून १२ उमेदवार वगळता एकालाही डिपॉझिट वाचविण्यात यश आले नाही. विशेषतः गाजावाजा करत रिंगणात उतरलेल्या अपक्ष किंवा बंडखोरांनादेखील अपेक्षित मते मिळाली नसल्याने त्यांच्या एकूणच भूमिकेकडे जनतेने पाठच फिरविल्याचे चित्र दिसून आले. मतांचा सर्वांत कमी आकडा ३१ इतका ठरला.
नागपुरातील सहाही मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी व बसपाच्या उमेदवारांकडून बऱ्यापैकी मते घेण्यात येतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्यातील २१ ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. दुसरीकडे नागपुरातून आभा पांडे, पुरुषोत्तम हजारे यांनी गाजावाजा करत अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केली होती व ते प्रस्थापित उमेदवारांची मते घेतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होता. मात्र यांच्यापैकी एकालाही १५ हजारांचा आकडादेखील गाठता आला नाही. नागपुरात एकूण ४८ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. सर्वच अपक्षांचेदेखील डिपॉझिट जप्त झाले. पश्चिम नागपुरातील नरेंद्र जिचकार (८,१६६), पूर्व नागपुरातील पुरुषोत्तम हजारे (११,३५९), आभा पांडे (९,४०२) यांना आठ हजारांचा टप्पा गाठता आला. परंतु त्यांनादेखील डिपॉझिट वाचविता आले नाही.
२६ टक्के अपक्ष शंभराच्या आत
नागपुरातील ४९ पैकी २६ टक्के (१३) अपक्षांचा शंभर मतांच्या आत गाशा गुंडाळल्या गेला. त्यातही काही जणांना पन्नाशीदेखील गाठता आली नाही. सर्वात कमी मतांचा आकडा ३१ इतका ठरला, १२ जणांना १०१ ते २०० दरम्यान मते मिळाली, तर १२ जणांना २०१ ते ३०० दरम्यान मते पडली. प्रत्येकी एका उमेदवाराला ३०१ ते ४०० तसेच ४०१ ते ५०० मते मिळाली. केवळ पाच अपक्षांना हजाराच्या वर जाता आले.
कोणाचे जप्त होते डिपॉझिट
आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैकी १/६ (सरासरी) हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. ज्या प्रमाणात अपक्ष रिंगणात होते, त्यावरून काही प्रमाणात मत विभाजन होईल व त्याचा फटका प्रमुख पक्षांना बसेल असा अंदाज होता मात्र, या उमेदवारांना मिळालेली मते पाहता तसे झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
डिपॉझिट जप्त उमेदवार
दक्षिण-पश्चिम नागपूर - १०
दक्षिण नागपूर - २०
पूर्व नागपूर - १५
मध्य नागपूर - १८
पश्चिम नागपूर - १८
उत्तर नागपूर - २४