वडिलांच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या विद्यार्थिनीने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 10:29 AM2022-03-21T10:29:18+5:302022-03-21T10:37:59+5:30
विज्ञाच्या वडिलांचे गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आई आणि विज्ञा या दोघी मामांच्या घरी राहत होत्या. वडिलांच्या मृत्यूने ती कमालीची अस्वस्थ झाली होती. ती फारशी कुणाशी बोलत नव्हती. एकांतात राहायची.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाने पितृछत्र हिरावून घेतल्याने अस्वस्थ झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोलीत शनिवारी रात्री ही घटना घडली. विज्ञा नरेंद्र निकंटे (वय २१) असे तिचे नाव आहे.
राजा निवास छोटी धंतोली येथे राहणाऱ्या विज्ञाने बीकॉम पूर्ण केले. त्यानंतर तिने एमबीएच्या ॲडमिशनची तयारी चालवली होती. तिची आई आयटी कंपनीत नोकरी करते. विज्ञाचे वडील आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणममध्ये नोकरी करायचे. त्यांचे गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे आई आणि विज्ञा या दोघी मामांच्या घरी राहत होत्या. वडिलांच्या मृत्यूने विज्ञा कमालीची अस्वस्थ झाली होती. ती फारशी कुणाशी बोलत नव्हती. एकांतात राहायची.
शनिवारी रात्री ८ च्या सुमारास विज्ञाने शयनकक्षात स्वत:ला गळफास लावून घेतला. बराच वेळेपासून ती बाहेर न आल्याने मामा आणि आईने तिच्या रूमचे दार ठोठावले. प्रतिसाद देत नसल्यामुळे दारावरच्या जाळीतून हात टाकून कडी काढली. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. विज्ञाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आल्याने आईने एकच हंबरडा फोडला.
आईचा आधार होती विज्ञा
पतीचे निधन झाल्यानंतर विज्ञामध्येच तिची आई आपले विश्व बघायची. मात्र, आत्महत्या करून आईचा मानसिक आधार स्वत: विज्ञानेच हिरावून घेतला. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर धंतोलीचे ठाणेदार महेश चव्हाण घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने विज्ञाच्या रूमची तपासणी करून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही हाती लागले नाही. तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याबाबत घरच्यांकडूनही अनभिज्ञता वर्तविण्यात आली. पोलीस तपास करीत आहेत.