नैराश्य हा वेळीच उपचारांमुळे बरा होणारा आजार : नितीन गुल्हाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:15 PM2018-09-11T23:15:15+5:302018-09-11T23:18:32+5:30
कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी येथे दिली.
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मानकापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊत उपस्थित होते.
डॉ. गुल्हाने म्हणाले, सध्या जगातील ३५० दशलक्ष लोक नैराश्यग्रस्त आहेत. जागतिक मानसिक आरोग्य सर्वेक्षणाच्या १७ देशांमधील केल्या गेलेल्या संशोधनात सर्वसाधारणपणे दर २० जणांमध्ये एक जण नैराश्याच्या आजाराने ग्रस्त आढळला आहे. त्यामुळे नैराश्याच्या आजाराबाबत जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम मनोरुग्णालयाने हाती घेतले आहे. याप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष कुथे यांनी आत्महत्याबाबतची कारणे, समज-गैरसमज याविषयी तर डॉ. शहा यांनी ‘आत्महत्या प्रतिबंधक-प्रेरणा प्रकल्प याबद्दलची माहिती दिली. डॉ. पातूरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हिरा वाघमारे यांनी केले, आभार डॉ. सौरभ टोपले यांनी मानले. कार्यक्रमाला टाटा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.