नैराश्य योग्य उपचाराने बरा होणारा आजार : माधुरी थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:27 PM2019-09-13T23:27:43+5:302019-09-13T23:30:07+5:30
‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी केले.
प्रादेशिक मनोरुग्णालयात मंगळवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. मंचावर डॉ. दीपक अवचट, डॉ. अभिषेक मार्मडे उपस्थित होते.
डॉ. थोरात यांनी शासनातर्फे विविध मानसिक आजारावरील उपचार व केलेल्या सुविधांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही भावनांविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बोला. जेणेकरून तुमच्या भावनांना मोकळी वाट मिळेल. आपलं खाणं आणि आपल्या भावना यात एक प्रकारचे नाते असते. म्हणूनच नेहमी चांगले सकस अन्न सेवन करावे. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत मन मोकळे करा. कार्यालयीन किंवा नेहमीच्या कामातून ‘ब्रेक’ घ्या. मग तो ब्रेक अगदी पाच मिनिटाचा का असेना, घरकामातून पाच मिनिटं शांत बसा. शनिवार-रविवार कुठेतरी फिरायला जाणे हा अतिशय चांगला ब्रेक ठरू शकतो. एखाद्या चांगल्या गोष्टीचा ‘छंद’ जोपासा. त्यात रमण्याचा प्रयत्न करा. त्यामुळेही तणावापासून काहीसे लांब राहता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहा, असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी डॉ. अवचट व डॉ. मार्मडे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.
संचालन संध्या दुर्गे यांनी केले. आभार डॉ. अमोल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला १२० रुग्ण उपस्थित होते. हा कार्यक्रम आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. तायडे व उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.