आईच्या मृत्यूमुळे नैराश्य, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By योगेश पांडे | Published: November 1, 2023 05:12 PM2023-11-01T17:12:56+5:302023-11-01T17:14:48+5:30
कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
नागपूर : आईच्या मृत्यूनंतर सातत्याने तणावात राहणाऱ्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून स्वत:चा जीव दिला. दोन वर्षांत पत्नी आणि मुलगा गमावल्यामुळे त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आर्यन संजय राऊत (१९, शिवाजीनगर, नंदाजी नगर) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. मुळचा तिरोडा येथील आर्यन हा अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल ब्रॅंचमध्ये द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. मुलगा अभियंता व्हावा अशी पालकांची इच्छा होती. पोटाला चिमटा काढून वडिलांनी त्याला अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला होता. २०२२ मध्ये त्याची आई मरण पावली. तेव्हापासून तो तणावातच राहत होता. अभ्यासातदेखील त्याचे मन लागत नव्हते. पहिल्या वर्षाचे त्याचे तीन विषय निघायचे होते.
आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून तो निघूच शकला नाही व मंगळवारी सायंकाळी घरी सिलींग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. त्याच्या वडिलांना हा प्रकार कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच निसटली. त्यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना कुठेही आर्यनने लिहीलेली चिठ्ठी वगैरे आढळली नाही. त्याचा स्मार्टफोनदेखील लॉक आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉक उघडण्यासाठी सायबर तज्ज्ञांकडे फोन दिला आहे.