गेल्या ११ वर्षापासून आंतरवासिता टेक्निशियन्स भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:47+5:302021-05-15T04:08:47+5:30
- पॅरामेडिकल स्टुडंट असोसिएशनची मागणी : जिल्हाधिकारी व मेडिकल अधिष्ठाता यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड वाॅर्डात ...
- पॅरामेडिकल स्टुडंट असोसिएशनची मागणी : जिल्हाधिकारी व मेडिकल अधिष्ठाता यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड वाॅर्डात अपुऱ्या मनुष्यबळाला भक्कम असा पर्याय म्हणून उपलब्ध झालेल्या आंतरवासिता टेक्निशियन्सला गेल्या ११ वर्षापासून आंतरवासिता भत्ता प्राप्त झालेला नाही. इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना हा भत्ता दिला जात असताना आम्हालाच का नाही, असा सवाल उपस्थित करत बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी स्टुडंट असोसिएशनने हा भत्ता देण्याची मागणी केली आहे.
बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी फेब्रुवारी २०२१ पासून आंतरवासितेकरिता शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये ऑपरेशन थिएटर्स, लेबोरेटरी, रक्तपेढी, क्ष-किरण, आकस्मिक विभागासारख्या वैद्यकीय विभागामध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, कोरोना काळात उद्भवलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा हे विद्यार्थी भरून काढत कोविड वार्डातही कार्यरत आहेत. मात्र, असे असतानाही या विद्यार्थ्यांना कसलीच सुरक्षा नाही. सोबतच आवश्यक असलेला आंतरवासिता भत्ताही दिला जात नाही. २०१० पासून हा अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हापासून ११ वर्ष लोटली तरी हा भत्ता मिळालेला नाही. एमबीबीएस, बीडीएस, नर्सिंग आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांना हा भत्ता दिला जात असताना आम्हालाच यापासून वंचित का ठेवले जाते, असा सवाल असोसिएशनने उपस्थित केला आहे. आम्हाला भत्ता द्या, अन्यथा आंदोलनाचा पावित्रा घेऊ, असा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष राजश उके, कोषाध्यक्ष निखिल क्षीरसागर, सचिव अमेश बडोले, विशाल वानखडे, हर्षदा शिंगनजुंडे, सुष्मी कनोजिया, देवयानी बंधाटे, स्तुती खंडागळे, पायल काळे, अनिकेत खाडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ.अविनाश गावंडे, मेडिकल सुपरिटेंडेन्ट यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
...................