रोहयोच्या कामापासून वंचित
By admin | Published: May 5, 2014 12:33 AM2014-05-05T00:33:08+5:302014-05-05T00:33:08+5:30
पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द येथे शेतकºयांचे खरीप हंगामाचे काम होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला.
देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या देवाडा खुर्द येथे शेतकºयांचे खरीप हंगामाचे काम होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र शेतकरी व शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे न मिळाल्याने या परिसरात रोजगार हमी योजना पांढरा हत्ता ठरली आहे. शेतीचा खरीप हंगाम संपला की, स्थानिक शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसते. शिवाय ग्रामीण परिसरात रोजगारासंदर्भात अन्य कुठेही काम मिळत नसल्याने अनेक लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होतात. हे लोक उन्हाळ्यातील संपूर्ण दिवस बाहेरगावी काढत असत. ग्रामीण परिसरातील शेतमजुरांवर होणारे हे नेहमीचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने त्यांच्या गावातच काम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यान्वित केली. सदर योजनेचा उद्देश जरी चांगला असला तरी यावर नियंत्रण असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासिन व अकार्यक्षम धोरणामुळे ही योजना या ठिकाणी सध्यस्थितीत दुर्लक्षीत झालेली आहे. देवाडा खुर्द येथील लोकसंख्या चार हजारांच्या घरात असून या ठिकाणी अनेक बेरोजगार तरुण हाताला काम मिळत नसल्याने वेठबिगारासारखे रिकामे फिरत असतात. या ग्रामपंचायतीअंतर्गत ९०० पेक्षा अधिक मजुरांच्या नावाने जॉबकार्ड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक कामे मंजुर असून मजुर क्षमतासुद्धा काम करण्यास सक्षम असताना रोजगार हमी योजनेच्या कामाला पाहिजे त्या प्रमाणात सुरूवात केली जात नसल्याने स्थानिक मजुरांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. जुलै महिन्यात पावसाने कहर केल्याने नदी-नाल्याच्या काठावरील शेतकºयांच्या जमिनीचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकणी नाल्याची पाळ फुटल्याने नाल्यातील पाणी थेट शेतकºयांच्या शेतांमध्ये शिरल्याने शेताला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. त्यांना दुबार पीक घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयांनी ग्रामपंचायतीअंतर्गत आयोजित ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत ‘नाला सरळीकरण’ योजनेच्या माध्यमातून सदरकाम मंजुर करून घेतले आहे. परंतु आजतागायत दोन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा नाला सरळीकरणाच्या कामाला ग्रामपंचायत प्रशासनाने सुरूवात केली नसल्याने पुढील खरीप हंगाम कसा साधायचा, या विवंचनेत स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे या ठिकाणची रोजगार हमी योजना तुर्तास पांढरा हत्ती ठरली आहे. स्थानिक ठिकाणी बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळत नसल्याने ते इतरत्र भटकत आहेत. दुसरीकडे ग्रामपंचायतस्तरावर कामे मंजुर असताना सुद्धा रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरूवात केली जात नसल्याने मजुरांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाले असून दुसरीकडे मात्र बेरोजगारांची फौज वाढत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला सरळीकरणाचे काम केल्यास फुटलेल्या पाळीतून येणारा पाण्याचा प्रवाह बंद होवून नुकसानग्रस्त शेतकºयांना पुढील उत्पादन घेणे शक्य होवून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी येणार नाही आणि बेरोजगारांच्या रिकाम्या हाताला काम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)