उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यायालयात हजर; निवडणूक शपथपत्रावर आक्षेप प्रकरण
By नरेश डोंगरे | Published: April 15, 2023 01:35 PM2023-04-15T13:35:02+5:302023-04-15T13:38:24+5:30
लेखी स्वरूपात बयान सादर
नागपूर : निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपविल्या प्रकरणात आरोपी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे उपस्थित झाले.
फडणवीस यांनी २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी ॲड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली होती.
या तक्रारीवरील गेल्या सुनावणी दरम्यान उके यांच्या बाजूने युक्तीवादाची तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात बयनासाठी उपस्थित राहावे लागते. त्यामुळे, फडणवीस यांना शनिवारी १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीस उपस्थित राहावे लागणार होते. त्यानुसार, ते उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांचे बयान नोंदविले. त्यांनी लेखी स्वरूपात आपले बयान सादर केले. न्यायालयात त्यांच्या बाजुने एडवोकेट देवेन चव्हाण आणि ॲड. उदय डबले यांनी कामकाज पाहिले.