उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन फिल्ड, पुराने नुकसान झालेल्या वस्त्यांची केली पाहणी
By मंगेश व्यवहारे | Published: September 24, 2023 02:30 PM2023-09-24T14:30:54+5:302023-09-24T14:32:47+5:30
मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई, विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले.
नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती नंतर झालेल्या नुकसानाची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला व माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट पासून पाहण्याची सुरुवात केली. त्यांनी स्वतः या परिस्थितीची पाहणी करीत घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई, विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले.
तसेच प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर पंचनामे करून लागणारी मदत दिली जाणार असल्याचे ग्वाही यावेळी दिले. तसेच पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी फडणीस यांनी दिले.