उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केवळ २३,५०० रुपयांची कॅश, एकूण सव्वा पाच कोटींची संपत्ती
By योगेश पांडे | Published: October 25, 2024 06:02 PM2024-10-25T18:02:40+5:302024-10-25T18:03:48+5:30
संपत्तीत पाच वर्षांत २३ टक्क्यांनी वाढ : शपथपत्रात चार प्रलंबित प्रकरणांची नोंद
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार सद्यस्थितीत त्यांच्या एकट्याच्या नावावर सुमारे सव्वा पाच कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत उपमुख्यमंत्र्यांची संपत्ती ही २३ टक्क्यांनी वाढली आहे. प्रामुख्याने जमिनींच्या बाजारमूल्यात गेल्या ५ वर्षांत झालेल्या वाढीमुळे अचल संपत्तीत वाढ झाली आहे.
२०१९ साली उपमुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिकरीत्या ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची चल संपत्ती व ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची अचल संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ इतका होता. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत १ कोटी ८० हजार २३३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ५६ लाख ०७ हजार ८६७ रुपयांची चल तर ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे.
त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर २०१९ साली ४ कोटी ३८ लाख ९७ हजार ७४१ रुपयांची संपत्ती होती. ती आता वाढून ७ कोटी ९२ लाख २१ हजार ७४८ इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत ८०.४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या नावावर ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपयांची चल तर ९५ लाख २९ हजारांची अचल संपत्ती आहे. फडणवीस यांनी अमृता फडणवीस यांच्याकडूनच ६२ लाखांचे कर्ज घेतल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
न्यायालयात चार प्रलंबित प्रकरणे
फडणवीस यांनी शपथपत्रात चार प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरूद्ध एकही गुन्हा (एफआयआर) दाखल नाही. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या चार खाजगी तक्रारींपैकी २ तक्रारी सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे.
फडणवीसांपेक्षा पत्नीची वार्षिक मिळकत अधिक
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा व्यवसाय शेती व समाजसेवा हा दाखविला आहे. त्यांची वार्षिक मिळकत ३८ लाख ७३ हजार ५६३ रुपये इतकी होती. तर त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी अमृता यांची वार्षिक मिळकत अधिक आहे. २०२३-२४ मध्ये अमृता यांची वार्षिक मिळकत ७९ लाख ३० हजार ४०२ इतकी होती. वेतन, शेअर्समधील कॅपिटल गेन, डिव्हिडेंट इत्यादींचा त्यात समावेश होता.