उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही : आदित्य ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 07:07 PM2019-08-27T19:07:57+5:302019-08-27T19:09:07+5:30
सध्या उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्विकारेल, असे म्हणत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांत आगामी विधानसभा निवडणूकांसाठी युती होईलच. ही युती सत्तेसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी आहे. मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रपरिषदेतील शब्दांवर आम्ही कायम राहणार आहो. कुणाचाही विश्वास शिवसेना तोडणार नाही. सध्या उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्विकारेल, असे म्हणत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले. मंगळवारी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नागपुरात पोहोचली. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
युतीमधील जागावाटपाबद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली आहे. तेच या बद्दल बोलतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे. मी निवडणूक लढवायची की नाही, कुठून लढवेल हे जनता ठरवेल. सध्या मी जनतेशी संवाद साधण्यावरच भर देत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यात सद्यस्थितीत विरोधक नसल्याचीच स्थिती आहे, असेदेखील ते म्हणाले. पत्रपरिषदेला सार्वजनिक बांधकाम विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा.कृपाल तुमाने, खा.राजन विचारे, आ.सुनिल शिंदे सचिन अहिर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कर्जमुक्तीमध्ये अनेक त्रुटी
यावेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जमाफीवरुन राज्य शासनावरच अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यासाठी सरकारची मदत केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यकर्ते मदत करत आहेत. जेथे सरकारकडून समस्या सुटत नाही तेथे शिवसेना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.
खंडणीखोर नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी
शिवसेनेच्या काही नेत्यांवर खंडणीखोरीचे आरोप लागत असल्याचा प्रश्न विचारला आदित्य ठाकरे यांनी ठोस उत्तर दिले नाही. परंतु अशा नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.