भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 11:15 AM2024-02-08T11:15:41+5:302024-02-08T12:33:36+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात माध्यमांशी संवाद साधला.

Deputy CM Devendra Fadnavis said that senior party leaders decide who to send to Rajya Sabha | भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

भाजपा पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले!

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून कोणाला संधी मिळेल ही उत्सुकता असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, अमरीश पटेल आदी नावे चर्चेत आहेत. राज्यसभेसाठी भाजपाकडून चर्चेत असलेल्या नावांबाबतची एक्सक्लुसिव्ह बातमी 'लोकमत'ने आज केली आहे. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार का?, असा प्रश्न विचारला. यावेळी पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही. त्यांच्यासोबत मी राजकीय चर्चा केली. त्यामध्ये राज्यसभा संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. पंकजा मुंडे पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. पंकजा मुंडेंना कोणतं पद द्यायचं, कोण राज्यसभेत किंवा लोकसभेत जाईल?, याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. 

कुणाला मिळणार संधी? 

प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे नाव राज्यसभा, विधान परिषदेसाठी दरवेळी चर्चेत असते, मात्र त्यांना अद्याप संधी मिळालेली नाही. तसेच अलीकडील वर्षांमध्ये पंकजा मुंडे यांचे नावही सातत्याने चर्चेत राहिले असले तरी त्यांनादेखील संधी मिळालेली नाही. नांदेडचे डॉ. अजित गोपचडे यांना मागे विधान परिषदेवर पाठविण्याचे नक्की झाले होते, पण ऐनवेळी  त्यांचे नाव वगळले होते. विभागीय संतुलन, जातींचे संतुलन, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवार देणे, महिलेला संधी आदी निकषांवर भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवेल असे मानले जाते. 

...तर भाजपा लढवेल चौथी जागा  

सहा जागांपैकी तीन जागा भाजपा लढवेल. एक जागा शिवसेनेला तर एक राष्ट्रवादीला दिली जाईल. भाजपा चौथी जागा लढण्याची शक्यता जवळपास नाही. मात्र महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिला तर मग आपणही चौथा उमेदवार द्यायचा असे भाजपाने ठरविले आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये आला तर भाजपा चौथी जागा लढेल असेही मानले जाते.

तावडेंना पक्ष संघटनेतच ठेवणार की...?  

बिहारचे भाजपा प्रभारी असलेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव ऐनवेळी समोर येऊ शकते. त्यांना पक्ष संघटनेतच ठेवायचे की सोबतच राज्यसभेची संधी द्यायची की लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवायची याबाबत लवकरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Web Title: Deputy CM Devendra Fadnavis said that senior party leaders decide who to send to Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.