‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री थिएटरमध्ये; भाजपसाठी विशेष शोचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2023 10:25 PM2023-05-09T22:25:29+5:302023-05-09T22:30:46+5:30
Nagpur News धर्मांतरण व लव्हजिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजन करण्यात आले होते.
नागपूर : धर्मांतरण व लव्हजिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपुरात रात्री ९च्या सुमारास हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले. या चित्रपटावरून राजकारण तापले असताना फडणवीस यांनी यामाध्यमातून कटू सत्य जनतेसमोर येत असल्याचा दावा केला.
मंगळवारी सायंकाळी मेडिकल चौकाजवळील मॉलमधील थिएटरमध्ये फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह चित्रपट पहायला पोहोचले. आपल्या देशातील विदारक सत्य समोर आणण्यात आले आहे. आपला देश पोखरण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. महिला व तरुणींची दिशाभूल करत त्यांना षडयंत्रात ओढले जात आहे. या गोष्टी समोर आल्या पाहिजे. या चित्रपटामुळे देशात मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचे डोळे उघडत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्यांना फाशी देण्याच्या वक्तव्यावर भाष्य केले, जर आव्हाड असे बोलले असतील तर ते चुकीचे आहे व बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी व विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी ते जे बोलतात त्यातून इतर समाजांमध्ये रोष निर्माण होत आहे. आव्हाड यांचे वक्तव्य तपासून पाहू व त्यात आक्षेपार्ह तसेच बेकायदेशीर भाषा असेल तर निश्चितच कारवाई होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.