पोलीस उपायुक्त राजमाने गुन्हे शाखेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:29 AM2019-07-09T00:29:09+5:302019-07-09T00:30:24+5:30
गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
तीन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांची गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून बदली झाली होती. त्याचवेळी प्रशासनातून राजमाने यांची वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. रोजच्या अर्थकारणामुळे सतत संशयाच्या नजरेने बघितल्या जाणाऱ्या वाहतूक शाखेत त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबवून वाहतूक पोलिसांची भ्रष्टाचार एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. यातून काही पोलीस चरफडले, मात्र राजमाने यांची स्वच्छ प्रतिमा समोर आली. दरम्यान, उपायुक्त भरणे अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा म्हणून पदोन्नती झाली. मात्र, गुन्हे शाखेच्या उपायुक्तांचे पद रिक्त असल्यामुळे त्यांनीच आतापावेतो ही जबाबदारी सांभाळली. काही दिवसांपासून गुन्हे शाखेच्या उपायुक्ताचे रिक्त पद भरण्यासंबंधाने घडामोडी सुरू झाल्या. बराच विचारविमर्श केल्यानंतर राजमाने यांना गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्याचे ठरले. त्यानुसार, शनिवारी तसा नियुक्ती आदेश काढण्यात आला. त्यानुसार, राजमाने यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी पदाची जबाबदारी घेताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची एक औपचारिक बैठक घेतली. त्यात शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करून गंभीर गुन्हे रोखण्याच्या संबंधाने प्रभावी उपाययोजना करण्याचेही निर्देश आपल्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले.