२३ लाख परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:39 PM2020-12-16T13:39:48+5:302020-12-16T13:40:16+5:30
Nagpur News प्रामाणिकपणाची साक्ष पटवीत हाती आलेले लाखो रुपये परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा नागपूर परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी बुधवारी सकाळी सत्कार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रामाणिकपणाची साक्ष पटवीत हाती आलेले लाखो रुपये परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा नागपूर परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी बुधवारी सकाळी सत्कार केला. यावेळी त्यांनी या सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. युवराज सदाशिव चामट, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले आणि अतुल गणेशराव चतुरकर अशी या चार रक्षकांची नावे आहेत.
काय आहे घटना?
शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात आढळलेल्या निनावी बॅगेतील २३ लाखांची रोकड चार सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जमा केली. ही रक्कम २३ लाख, ८९ हजार, ५८० रुपयांची रोकड आणि ८१ लाख, ९५ हजार, ४५ एवढी होती.
धनादेशावरून सापडला मालकाचा पत्ता
ही रोकड कुणाची याचा शोध धनादेशाच्या माध्यमातून पोलिसांनी लावला. लोकमत चौकाजवळ श्रीराम सेल्स नामक फर्मची ही रोकड असल्याचे स्पष्ट झाले. फर्मचे कर्मचारी दररोज वेगवेगळे व्यापारी आणि प्रतिष्ठानातून रोकड व धनादेश संकलित करतात. ते बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर ही रोकड जमा केली आणि ते मुंजे चौकातून जात असताना दुचाकीवरून पैशाची बॅग खाली पडली. ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध करू लागले. मात्र, सुदैवाने ही बॅग प्रामाणिक सुरक्षा रक्षकांच्या हाती लागली.