लाचखाेर उपकार्यकारी अभियंता अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:08 AM2021-05-12T04:08:58+5:302021-05-12T04:08:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : विजेच्या टी. एन. लाईन स्थानांतरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने अहवाल सादर केला. काेणत्याही त्रुट्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : विजेच्या टी. एन. लाईन स्थानांतरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने अहवाल सादर केला. काेणत्याही त्रुट्या न काढता हा अहवाल स्वीकारण्यासाठी महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने कंत्राटदारास ३० हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करप्शन ब्युराे) पथकाने त्या उपकार्यकारी अभियंत्यास अटक केली. ही कारवाई महावितरण कंपनीच्या खापा (ता. सावनेर) येथील कार्यालयात मंगळवारी (दि. ११) दुपारी करण्यात आली.
गजानन बळीराम डाबरे (५४) असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर उपकार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. तक्रारकर्ते हे नरेंद्रनगर, नागपूर येथील रहिवासी असून, इलेक्ट्रिक कंत्राटदार आहेत. त्यांनी खापा शहरातील लेआउटमधील विजेच्या एच. टी. लाईनच्या स्थानांतरणाचे काम घेतले हाेते. ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तसा अहवाल महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गजानन डाबरे यांच्याकडे सादर केला हाेता. हा अहवाल त्रुट्या न काढता स्वीकारण्यासाठी गजानन डाबरे यांनी कंत्राटदारास ३० हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर येथील ‘एसीबी’च्या कार्यालयात तक्रार नाेंदविली.
तक्रार प्राप्त हाेताच ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी प्रकरणाची तपासणी केली आणि मंगळवारी दुपारी खापा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. डाबरे यांनी कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताच ‘एसीबी’च्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली. या प्रकरणी खापा पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ही कारवाई ‘एसीबी’च्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद ताेतरे यांच्या मार्गदर्शनात ‘एसीबी’चे पाेलीस उपअधीक्षक संदीप जगताप, हवालदार प्रवीण पडाेळे, लक्ष्मण परतेती, अमाेल मेनघरे, दीपाली भगत, प्रमाेद पिंपळकर यांच्या पथकाने केली.