नागपुरात उपकार्यकारी अभियंता निलंबित तर कार्यकारी अभियंत्याची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 09:57 PM2021-10-05T21:57:28+5:302021-10-05T22:00:01+5:30
Nagpur News काेराडी वीज प्रकल्पातील काेळसा हाताळणी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता सिंग यांना निलंबित केले आहे.
नागपूर : काेल वाॅशरीजमधील काेळसा अफरातफर प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने या प्रकरणाची चाैकशी केली. या समितीने चाैकशी अहवाल व्यवस्थापकीस संचालकांना सादर केला असला तरी ताे उघड व्हायचा आहे. तत्पूर्वी वीज प्रकल्पातील काेळसा हाताळणी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता सिंग यांना निलंबित केले आहे. (Deputy Executive Engineer suspended in Nagpur )
काेराडी वीज प्रकल्पाला वेकाेलिच्या गाेंडेगाव (ता. पारशिवनी) खाणीतून काेळसा पुरवठा केला जाताे. खाणीतील काेळसा काेल वाॅशरीजमध्ये जात असून, नंतर वीज प्रकल्पात आणला जाताे. दरम्यान, पुरवठादारांनी यात अफरातफर करीत निकृष्ट काेळसा वीज प्रकल्पात पुरविल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे महानिर्मितीने संचालक (खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(निसवसु) अभय हरणे, कार्यकारी संचालक (माहिती व तंत्रज्ञान) नितीन चांदूरकर व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक राजू मालेवार यांच्या समितीमार्फत या प्रकरणाची चाैकशी केली.
चाैकशी समितीने काेराडी वीज प्रकल्पातील सुरक्षा विभाग, जीपीएस पद्धती, कोळसा हाताळणी विभाग, गोंडेगाव कोळसा खाण, काेल वाॅशरीजची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मते नाेंदवून घेतली. या प्रकरणात त्यांना काही महत्त्वपूर्ण दाेष आढळून आले आहेत. वीज प्रकल्पात जीपीएस प्रणाली लावली असली तरी उशिरा काेळसा घेऊन येणाऱ्या ट्रक मालकांवर महानिर्मितीने अद्याप काेणतीही दंडात्मक कारवाई केली नाही, यासह अन्य बाबी चाैकशी समितीच्या निदर्शनास आल्या आहेत.
ट्रक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
या समितीला चाैकशीदरम्यान काेराडी वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक ट्रक आढळून आला असून, त्याचा क्रमांक मात्र स्पष्ट झाला नाही. हा ट्रक महत्त्वाचा पुरावा असल्याचे मानले जात आहे. या सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांच्या दिशांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. कॅमेऱ्यात आढळून आलेल्या एका ट्रकबाबत सुरक्षा विभागातील कुणालाही माहिती नसल्याचे निदर्शनास आले. विशिष्ट अलार्म, ट्रक थांबल्यानंतर जीपीएस प्रणाली ने सूचना केल्यावरही जबाबदारी असणारे अधिकारी न पाेहाेचणे, खाण व वीज प्रकल्पातील काेळशाच्या ग्रेडमधील तफावत यासह अन्य बाबी समितीे टिपून घेतल्या आहेत.