दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; उप वन संरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:00 AM2021-03-26T11:00:20+5:302021-03-26T11:11:30+5:30
Nagpur news क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली.
नागपूर : क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली.
विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीस ही सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेले.
वनखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने वनरक्षक वनपाल वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनांनी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी व उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे रेड्डी यांना वारंवार या संदर्भात तक्रारी देऊन सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे
काय आहे नेमकी ही घटना?
मेळघाटातील डिजिटल व्हिलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (३२) यांनी गुरुवारी सायंकाळी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघड झाली. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली, त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांनी अनेक नातेवाइकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही लवकर या, खिचडी करते, असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच, तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सांगितले. त्यामुळे मोहिते हादरुन गेले.
मोहित यांनी लगेचच दीपाली यांच्या आईला फोन केला. त्यांच्या आईने मुलगी दीपाली यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, पलीकडून फोनला प्रतिसाद न मिळाल्याने मोहिते यांनी तातडीने हरिसाल येथील एम.एस. बिरगोने, ज्योती बिरगोने, संजीव डिकार व महिला वनरक्षक बिसनन यांच्याशी संपर्क साधून त्यांना शासकीय निवसास्थानी जायला सांगितले. ते गेले असता, क्वार्टरची दारे आतून बंद होती. दार तोडून आत गेल्यावर दीपाली चव्हाण या रक्तबंबाळ अवस्थेत पलंगावर कोसळलेल्या स्थितीत आढळून आल्या. त्यांची रिवॉल्वरदेखील बाजूला पडलेली होती. त्यांनी छातीच्या उजव्या भागावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.