पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:38 PM2019-05-24T22:38:15+5:302019-05-24T22:39:05+5:30
भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) उपमहानिरीक्षक दर्जाच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयातून आज जारी करण्यात आले. त्यात नागपुरातील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) उपमहानिरीक्षक दर्जाच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयातून आज जारी करण्यात आले. त्यात नागपुरातील पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे तसेच अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांचाही समावेश आहे.
अंकुश शिंदे गडचिरोली पोलीस परिक्षेत्राचे (नागपूर कॅम्प) उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आता पदोन्नतीवर सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदलून गेले आहेत. शिंदे यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली गोंदियातील नक्षल्यांना बॅकफूटवर नेण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. अनेक नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यास त्यांनी बाध्य केले. १ मे रोजी गडचिरोलीत घडलेला मोठा आघात आणि त्यानंतर त्यांनी नक्षल्यांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी घेतलेली भूमिकाही चर्चेला आली.
शिंदे यांच्या रिक्त जागेवर सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे यांची बदली झाली आहे. सोलापुरात तांबडे यांनी कम्युनिटी पुलिसिंगवर जास्त भर दिला. तेथील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा दत्तक योजना राबविली. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी या योजनेचा त्यांनी चांगला वापर करून घेतला. त्यामुळे सोलापुरातील चोºया- घरफोड्या कमी करण्यातही त्यांनी यश मिळवले. सुट्यांचा कालावधी संपवून आपण नागपुरात नवी जबाबदारी घेण्यासाठी येत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
अतिरिक्त आयुक्तांचा कोटा पूर्ण
सोलापूरलाच पोलीस उपायुक्त म्हणून सेवारत असलेले एस. एच. महावरकर यांची पदोन्नतीवर नागपूर शहरात बदली झाली आहे. येथे ते अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) म्हणून रुजू होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाच्या दोन जागा रिक्त होत्या. त्यातील उत्तर आणि दक्षिण विभागाच्या दोन्ही प्रभागाची जबाबदारी एकच अधिकारी सांभाळत होते. तिसरे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारीही प्रभार म्हणून दुसरे अधिकारी सांभाळत होते. गेल्या आठवड्यात पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांची पदोन्नती झाली. त्यांना अतिरिक्त आयुक्त गुन्हे शाखा ही जबाबदारी मिळाली. तर, आज महावरकर यांची उत्तर प्रभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. हा प्रभार आतापावेतो अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर हेच सांभाळत होते.