उपनिबंधकाने मागितले २१ लाख
By Admin | Published: July 14, 2016 02:58 AM2016-07-14T02:58:50+5:302016-07-14T02:58:50+5:30
२१ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उप-निबंधकास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. महेंद्र भाऊसाहेब मगर (४४) रा. निर्मलनगरी,...
लाच मागितल्याप्रकरणी अटक : एसीबीच्या कारवाईने अधिकारी हादरले
नागपूर : २१ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उप-निबंधकास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. महेंद्र भाऊसाहेब मगर (४४) रा. निर्मलनगरी, भांडे प्लॉट चौक असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मगर हे रघुजीनगर येथे दुय्यम उपनिबंधक कार्यालयात उपनिबंधक आहे.
तक्रारकर्ता राजेश काकडे हे माँ सर्वमयी नागरी सहकारी पत संस्थेचे व्यवस्थापक आणि जॉर्इंट मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय सहकार आयुक्त, दिल्ली यांच्यातर्फे सहकार विभागाला पंतसंस्थांची चौकशी करण्यासंबंधी दिशा-निर्देश वेळोवेळी जारी केले जातात. या आधारावर मगरने दोन्ही पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी केली. मगरने काकडे यांना दोन्ही संस्थेच्या कारभारात अनियमितता असल्याचे सांगितले. तसेच सर्व संचालकांच्या विरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे काकडे व इतर संचालक घाबरले.
दोन्ही पतसंस्थेमध्ये ३० संचालक आहेत. मगरने प्रत्येक संचालकाकडून ३ लाख रुपये याप्रमाणे ९० लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. काकडे यांनी ५ -६ संचालक नसल्याचे सांगितल्यावर ७८ लाख रुपये मागू लागला.
पैसे न दिल्यास कारवाईसाठी तयार राहण्यासही सांगितले.
सहावेळा फसला ट्रॅप
नागपूर : एप्रिल ते मे महिन्यादरम्यान काकडे आणि मगर यांच्यात बोलणे सुरू होते. हो-नाही करीत २१ लाख रुपयावर मगर अडून बसला. काकडे यांनी यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली. यानंतर त्याला रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने योजना आखली. ठरलेल्या योजनेनुसार एसीबीने मगरला पकडण्यासाठी ५ ते ६ वेळा जाळे पसरविले. परंतु तो खूप तरबेज निघाला. तो काकडेला कधी यायचे म्हणून वेळच सांगत नव्हता. अचानक मगर काकडेला भेटू लागला. परंतु काकडे यांनी पैसे दिले नाही. पुन्हा त्याने भेटणे बंद केले. तसेच फोनवरही बोलण्याचे टाळले. मागील दोन महिन्यांपासून हा खेळ सुरू होता. अखेर एसीबीने बुधवारी मगरला अटक करून सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अटकेनंतर लगेच मगरच्या भांडेप्लॉटस्थित घरी आणि पुणे येथील निवासस्थानावर धाड टाकण्यात आली. नागपूरच्या घरी काहीच आक्षेपार्ह सापडले नाही, तर पत्नी बाहेरगावी गेली असल्याने पुणे येथील घराला सील करण्यात आले. मगर मूळचा पुणे येथील रहिवासी आहे. सात महिन्यांपूर्वी नागपूरला बदली झाली. तेव्हापासून तो सक्करदरा येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात तैनात होता.
जिल्ह्यात ८२५ सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाची देखभाल दुय्यम उपनिबंधक कार्यालयाद्वारे केली जाते. मगरच्या अधिकार क्षेत्रात अडीचशे पतसंस्था येतात.
अधिकांश पतसंस्थांमधील कामकाजात काही त्रुटी असतात. याचा लाभ घेऊन वसुली केली जाते. काकडेला धमकावल्यानंतर मगर दुसऱ्या संस्थेच्या मागे लागला होता. ही कारवाई अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मोहन सुगंधी, निरीक्षक मोनाली चौधरी, हवालदार भानुदास गीते आणि चंद्रशेखर ढोक यांनी केली. (प्रतिनिधी)