देसाई संभाळणार नागपूर कारागृह?
By admin | Published: May 8, 2015 02:07 AM2015-05-08T02:07:56+5:302015-05-08T02:07:56+5:30
पुण्यातील येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांची नागपूर कारागृहाच्या अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.
नागपूर : पुण्यातील येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांची नागपूर कारागृहाच्या अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांनी तत्काळ नागपुरात रुजू व्हावे,असे बदलीच्या आदेशात नमूद आहे. मात्र, इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच ते सुद्धा हा बदली आदेश फिरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
देसाई गेल्या तीन वर्षांपासून येरवडा कारागृहाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याच कार्यकाळात २६/११ चा जिवंत पकडला गेलेला आरोपी, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आले. अनेक दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह संजय दत्तसारखे सेलिब्रेटी आरोपीही देसार्इंच्या कार्यकाळात येरवड्यात शिक्षा भोगत आहेत.
त्यांची एकूणच शैली बघता त्यांना नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याचा सरकारने निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या आदेशात त्यांना तत्काळ नागपूरची सूत्रे स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, ते गुरुवार सायंकाळपर्यंत येथे पोहचले नव्हते. त्यांच्यापुर्वी यू.टी. पवार यांची नागपूर कारागृहाचे अधीक्षक म्हणून बदली झाली होती. मात्र, पवार यांनी ठाण्यातून धावपळ करीत बदली आदेश फिरवला. नागपूरऐवजी त्यांनी येरवड्याचा पदभार पदरात पाडून घेतला.
पवार यांच्यापूर्वी अन्य सहा अधिकाऱ्यांनीही नागपूर कारागृहाची जबाबदारी स्वीकारण्याचे टाळले. तर, आता देसाईसुद्धा नागपूरऐवजी दुसऱ्या ठिकाणी बदली करून घेण्याचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलणी करण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर लोकमत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.(प्रतिनिधी)