ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट अन् भरकटलेले ते तिघे
By नरेश डोंगरे | Published: February 14, 2024 01:56 PM2024-02-14T13:56:08+5:302024-02-14T13:56:34+5:30
नातेवाईक झाले कावरेबावरे : पोलिसांच्या दिलाशाने सारेच सावरले
नरेश डोंगरे/नागपूर: ओसाड गाव, आई-वडिलांची ताटातूट, खायचे वांदे अन् मायेची उणीव अशा वातावरणात वाढणाऱ्या त्या कोवळ्या जीवांना ‘मायेची आस लागल्याने’ त्यांनी आपले गाव, आपला प्रांत सोडून झगमगती उपराजधानी गाठली. मात्र, नागपुरात पाय ठेवताच ते सैरभैर झाले अन् ‘मेले’मे (जत्रेत) बिछडल्यासारखे एकमेकांपासून दुरावले. परिणामी त्यांची अवस्था आणखीच वाईट झाली. अशात दोघांनी कसे-बसे आपले गाव गाठले. एक मात्र रडत-पडत येथेच राहिला. तिकडे गावात गेलेल्यांनी आपला ८ वर्षांचा चिमुकला चुलत भाऊ नागपुरात ‘बिछडल्याची कथा’ नातेवाइकांसह छोट्याशा गावाला ऐकवली. त्यामुळे उभा गावच त्याला शोधण्यासाठी तयार झाला अन् अखेर ८ दिवसांनंतर ‘तो’ त्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर रेल्वे स्थानकावरच त्यांनी जमेल तसा आनंदोत्सव साजरा केला.
घटना छत्तीसगडमधील एका ओसाड गावातील चिमुकल्यांची आहे. रोजगाराची वानवा असल्याने येथील अनेक जण पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या गावात जातात. कुणाचा मुलगा, कुणाचा पती तर कुणाची पत्नी आपल्या कुटुंबीयांना गावात ठेवून बाहेर पडते. मिळेल ते काबाडकष्ट करते. गावातील अशाच एका अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिला आपल्या चिमुकल्यांना आणि पतीला गावात ठेवून हिंगणा परिसरातील वीटभट्टीवर कामाला आली. गावाच्या तुलनेत बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याने ती स्वत:चे पोट भरते. सोबतच आपल्या चिमुकल्यांच्या भरणपोषणासाठी पतीलाही पैसे पाठविते. कधीमधी गावात जाऊन त्यांची भेटही घेते. गेल्या काही दिवसांपासून मात्र ती गावाकडे गेलीच नाही. त्यामुळे तिची चिमुकली मायेच्या उणिवेमुळे अस्वस्थ झाली.
त्यातील ८ वर्षांच्या आदित्यने ‘माय’ला भेटण्यासाठी हट्टच धरला. बाप मागणी पूर्ण करीत नसल्याने नात्यातील नऊ वर्षीय सोनू आणि १२ वर्षांच्या सपनाकडे (तिघांचीही नावे काल्पनिक!) तो आक्रंदन करू लागला. त्यामुळे आदित्यसोबत सोनू आणि सपनाही गहिवरले. संधी साधून ४ फेब्रुवारीला त्यांनी गाव सोडले अन् ट्रेनने नागपुरात पोहोचले.
रेल्वे स्थानकाबाहेर पडताच मोठमोठे रस्ते, पूल, झगमगाट, गाड्यांचा गोंगाट बघून ते कावरेबावरे झाले. काय करावे, कुठे जावे ते कळेनासे झाले असतानाच आदित्य गर्दीत भरकटला. तो दिसेनासा झाल्याने सोनू आणि सपनाही गोंधळले. बराच वेळ शोधाशोध करूनही तो दिसत नसल्याने हे दोघे रेल्वे स्थानकावर आले आणि याला-त्याला विचारत आपल्या गावाकडे परतले. त्यांनी आदित्य नागपुरातील ‘गर्दीत बिछडल्याचे’ नातेवाइकांना ऐकवले. त्यानंतर नातेवाइकांसह गावकऱ्यांनी नजीकचे पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
तो चाइल्ड लाइनकडे, नातेवाईक ठाण्यात
इकडे रडत रडत इकडे-तिकडे पळणारा आदित्य रेल्वे पोलिसांच्या हाती लागला. त्यांनी त्याला जीआरपी ठाण्यात आणून विचारपूस केली. त्याने तुटक्या-फुटक्या भाषेत जमेल तशी माहिती पोलिसांना दिली. ही माहिती ठाणेदार मनीषा काशिद यांनी पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांना कळविली. त्यांनी लगेच चाइल्ड लाइनच्या माध्यमातून आदित्यला सेफ झोनमध्ये पाठवले. दरम्यान, शनिवारी आदित्यचे नातेवाईक नागपूर रेल्वे पोलिसांकडे पोहोचले.
अन् आनंद गगनात मावेनासा झाला
येथे आदित्य सुखरूप असला तरी शनिवारी, रविवारी कायदेशीर अडचणीमुळे त्याला चाइल्ड लाइनमधून नातेवाइकांच्या ताब्यात देणे शक्य झाले नाही. ती प्रक्रिया सोमवारी पार पाडण्यात आली. त्यानंतर ठाणेदार मनीषा काशिद यांनी आदित्यला त्याच्या आईच्या कुशीत सोपविले. तो ताब्यात येताच आईवडिलांसह अन्य नातेवाइकांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला घेऊन सोमवारी रात्री उशिरा ते आपल्या गावाकडे परतले.