नागपुरात देशमुख पिता-पुत्रासाठी ‘साखर’ ठरणार कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:48 PM2018-02-20T20:48:03+5:302018-02-20T20:59:50+5:30
सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याकडे तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीवरून पुन्हा एकदा माजी मंत्री रणजित देशमुख व भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख संकटात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याकडे तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीवरून पुन्हा एकदा माजी मंत्री रणजित देशमुख व भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख संकटात येणार आहेत. संबंधित थकबाकी वसूल करण्यासाठी राज्याचे साखर आयुक्त यांनी विभागीय साखर संचालकांना पत्र पाठविले आहे. या आधारावर आता रणजित देशमुख, आशिष देशमुख यांच्यासह सर्व १९ संचालकांना नोटीस जारी होणार आहे.
हेटीसुर्ला येथील साखर कारखान्याचे रणजित देशमुख हे अध्यक्ष होते. तर संचालक मंडळात त्यांच्या पत्नी रूपाताई देशमुख व पुत्र आ. आशिष देशमुख यांच्यासह एकूण १९ जणांचा समावेश होता. २००३-०४ मध्ये हा कारखाना बंद पडला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ४ मे २००७ रोजी या कारखान्याची १२ कोटी ९५ लाख रुपयांमध्ये विक्री केली. सद्यस्थितीत या साखर कारखान्याकडे कोणतीही मालमत्ता शिल्लक नाही. कारखान्याने २१.७२ कोटींचे कर्ज घेतले होते. त्यावर ५१.७८ कोटी रुपयांची व्याज आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम ७३ कोटी ५० लाखांवर पोहोचली आहे.
आता ही रक्कम सक्तीने वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. देशमुख यांच्यासह संचालक मंडळाकडून ही रक्कम वसूल करावी, असे पत्र साखर आयुक्तांनी विभागीय साखर संचालकांना पाठविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आधारावर पुढील दोन दिवसात देशमुख यांच्यासह सर्व १९ संचालकांना नोटीस जारी होणार आहे. कर्जाच्या रकमेची मुदतीत परतफेड केली नाही तर संचालकांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संचालक मंडळावरही टांगती तलवार
रणजित देशमुख यांची पत्नी रूपाताई व मुलगा डॉ. आ. आशिष यांच्यासह संचालक मंडळात कोमलचंद राऊत, धर्मेंद्र पालीवाल, अमोल शशिकांत देशमुख, अरुणराव घोंगे, सुरेश कुहिटे, अशोक धोटे, भाऊराव भोयर, शिशुपाल यादव, सूर्यकांत कुंभारे, प्रभुदयालसिंग रघुवंशी, राजेंद्रकुमार देशमुख, अॅड. लखनलाल सोनी, प्रमिलाताई महाजन, विवेक मोवाडे, विजय भजन, टी.पी. निकम यांचा समावेश होता. या सर्वांना कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे.
देशमुखांच्या संकटात वाढ
आयडीबीआय बँकेच्या थकीत कर्जाच्या प्रकरणी रणजित देशमुख यांची मालमत्ता जप्त होण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर लता मंगेशकर हॉस्पीटलला शैक्षणिक उपयोगासाठी दिलेल्या जमिनीचा व्यावसायीक वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावन संबंधित जमीन शासनजमा का करू नये, अशी विचारणा केली. त्या पाठोपाठ आता हेटीसुर्ला साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत कर्जावरून देशमुख यांना पुन्हा एका नोटीसीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे देशमुख यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
साखर कारखान्यावर असे आहे कर्ज
बाब कर्ज व्याज एकूण
शासकीय भाग भांडवल १२.०० ०० १२.००
शासकीय हमी वरील कर्जे ८.६१ ४९.८२ ५८.४३
शासन हमी शुल्क ०.३६ ०.११ ०.४७
सॉफ्ट लोन ०.७५ १.८५ २.६०
----------------------------------------------------------
एकूण २१.७२ ५१. ७८ ७३.५०