देशमुख, केदार यांची मंत्रिपदी वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:53 AM2019-12-30T10:53:07+5:302019-12-30T10:54:57+5:30
राष्ट्रवादीचे नेते काटोलचे आमदार अनिल देशमुख व काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते काटोलचे आमदार अनिल देशमुख व काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. देशमुख हे तब्बल पाचव्यांदा तर केदार हे दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांना त्यांच्या पक्षाकडून तसे फोन आले आहेत. विशेष म्हणजे १९९५ मध्ये हे दोन्ही नेते अपक्ष म्हणून विधानसभेत पोहचले होते व युती सरकारमध्ये मंत्रीही झाले होते.
अनिल देशमुख यांना शनिवारी दुपारी १ वाजताच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. विशेष म्हणजे देशमुख यांना मंत्रिपदाचे संकेत शरद पवार यांच्या नागपूर दौºयातच मिळाले होते. देशमुख रविवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले. देशमुख तब्बल पाचव्यांदा मंत्री होणार असून, यापूर्वी ते सलग १८ वर्षे मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे ते जेव्हाही निवडून आले, तेव्हा मंत्री झाले आहेत. २०१४ मध्ये ते निवडणूक हरले होते. त्यावेळी राज्यातील आघाडी सरकारही गेले होते. सहकारमहर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र असलेले आ. सुनील केदार यांची जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर पकड आहे. आ. केदार हे तब्बल पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. एकदा त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९९२ मध्ये सर्वप्रथम केदार यांनी पाटणसावंगी सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व विजयी होत सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पुढे १९९५ मध्ये ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्याचवेळी युती सरकारमध्ये ऊर्जाराज्यमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातून नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यामुळे विस्तारात कुणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख, काँग्रेसकडून आ. सुनील केदार तर शिवसेनेच्या कोट्यातून आ. आशिष जयस्वाल यांचे नाव आघाडीवर होते. देशमुख यांना शनिवारीच निरोप मिळाला होता. त्यामुळे ते निश्चिंत होते. केदार यांना रविवारी रात्री ७.३०वाजेपर्यंत निरोप मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांचे समर्थक अस्वस्थ होते. शेवटी निरोप येताच केदार समर्थक सुखावले. आ. जयस्वाल यांना मात्र रात्री उशिरापर्यंत शिवसेनेकडून निरोप आला नव्हता. जयस्वाल मात्र मुंबईत पोहोचले आहेत.
मंत्रिपदापूर्वीच देशमुखांना मिळाला होता लालदिवा
अनिल देशमुख हे १९७० पासून युवक कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाले. या काळात युवक काँग्रेसचा देशभरात जोर होता. मे १९९२ मध्ये देशमुख हे पंचायत समितीची निवडणूक लढले व सभापती झाले. २३ मे ते ९ जून १९९२ या काळात सभापती राहिलेले देशमुख ९ जुलै १९९२ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. या काळात राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला व त्याचवेळी देशमुख यांना लाल दिवा मिळाला होता.