देशमुख पूत्राचे फाऊंडेशनही रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:30+5:302021-09-19T04:09:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आयकरविभागाच्या पथकाने सलग दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आयकरविभागाच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशी, शनिवारी सुद्धा त्यांच्याशी संबंधित संस्थांची चौकशी केली. सूत्रांनुसार अनिल देशमुख यांचे पूत्र सलील देशमुख यांचे कोशिश फाऊंडेशन सुद्धा आता चौकशीच्या घेऱ्यात आले आहे. आयकर विभागाच्या पथकाने फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचीही विचारपूस केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आयकर विभागाची कारवाई शनिवारी दुसऱ्या दिवशीही रात्रीपर्यंत सुरू होती. शुक्रवारी आयकर विभागाच्या पथकाने देशमुख यांच्या विविध ठिकाणांवर धाड टाकली होती. गेल्या ४८ तासांपासून आयकर विभागाचे पथक अतिशय सूक्ष्मपणे दस्तावेज तपासत आहेत. विभागाकडून अजूनपर्यंत अधिकृतपणे कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीए किशोर देवानी यांच्या घरी व कार्यालयातही आयकर विभागाचे पथक पोहोचले होते. देशमुख यांच्याशी संबंधित शंकरनगर येथील रचना गॅलक्सी अपार्टमेंट येथील फ्लॅटचीही तपासणी करण्यात आली. यावेळी महत्वपूर्ण दस्तावेज जप्त करण्यात आल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. शनिवारी मिडास हाईट्स, रामदासपेठ येथील देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयकर विभागाने कारवाई केली. फेटरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी सोबतच देशमुख यांच्या सिव्हील लाईन्स व काटोल येथील निवासस्थानीसुद्धा आयकर पथकाने तपासणी केली. कर चोरीच्या आरोपाअंतर्गत देशमुख यांच्या नागपूर व काटोल येथील निवास व एनआयटीमध्ये आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली होती. यावेळी पथकाच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे पथकही तैनात करण्यात आले होते.
-बॉक्स
-शैक्षणिक संस्थेला मिळालेल्या दानाचीही चौकशी होणार
सूत्रानुसार देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थेला मिळालेल्या ४.१८ कोटी रुपयांच्या दानाचीही चौकशी केली जात आहे. असा दावा केला जात आहे की, हे पैसे दिल्ली येथील चार कंपन्यांनी श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा केले होते. ईडी व आता आयकर विभागाच्या धाडीमुळे अनिल देशमुख संकटात फसल्याचे दिसून येत आहे. १०० कोटी रुपये वसुली प्रकरणात तपास यंत्रणा आणखी सक्रिय झाल्या आहेत. देशमुख यांच्याविरुद्ध ईडीद्वारा लूकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याचीही चर्चा आहे. देशमुख यांना आतापर्यंत ईडीने पाच वेळा नोटीस जारी केली आहे.